जनआंदोलन समितीच्या नेत्यांचा महापालिका प्रशासनाला इशारा

वसईकरांचा विरोध पत्करून जर महापालिकेत गावे समाविष्ट केली तर पुन्हा वाघोलीसारख्या अप्रिय आणि हिंसक घटना घडतील, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. महापालिकेत गावांच्या समावेशाविरोधात वातावरण पेटले असून वसईच्या निर्मळ गावात झालेल्या सर्वपक्षीय सभेत भाजपचे नेते श्याम पाटकर यांनी हा इशारा दिला. या सभेत या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावांच्या प्रश्नावरून वाघोली गावात हिंसक आंदोलन झाले होते.

वसईत महापालिकेतून गावे वगळण्याबाबत सरकारची सुरू असलेली चालढकल आणि पुन्हा नवीन २१ गावांचा समावेश यावरून वसईत रणकंदन माजले आहे. जनआंदोलन समितीने ग्रामस्थांना आंदोलनाची हाक दिली आहे. उत्तर आणि दक्षिण वसईला जोडणाऱ्या निर्मळ गावात शनिवारी सभा घेण्यात आली. गावांचे आंदोलन सुरू असताना वाघोली गावात हिंसक आंदोलन झाले होते. पोलिसांनीही नंतर याच गावात घुसून ग्रामस्थांवर लाठीमार केला होता. त्याचा संदर्भ भाजपाचे नेते श्याम पाटकर यांनी आपल्या भाषणातून दिला. वसईतल्या सत्ताधारी आमदारांनी आपल्या उचापती थांबवल्या नाहीत तर पुन्हा वाघोलीसारख्या हिंसक घटना घडतील असा इशारा त्यांनी दिला. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकार आणि वसईच्या सत्ताधारी आमदारांची असेल असेही ते म्हणाले.

प्राध्यापक विन्सेट परेरा यांनी सध्याच्या न्यायालयीन लढाईची माहिती देऊन आंदोलनाची गरज आणि भूमिका विशद केली. तर जनआंदोलन समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी या पट्टय़ातून मागील विधानसभेत ६५ हजारांच्या मतांचा पाठिंबा मिळाल्याची आठवण करून दिली. महापालिकेतून गावे वगळण्याच्या ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाशी जनआंदोलन कायम बांधील असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसच्या समीर वर्तक यांनी सर्व पक्ष, संघटना यांना सोबत घेऊन आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेत डॉमनिका डाबरे, विनायक निकम, शिवा किणी, विजय पाटील, प्रफुल्ल ठाकूर, टोनी डाबरे आदींचीही भाषणे झाली.