ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांमध्ये गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षांची लागवड करण्याची घोषणा करणाऱ्या प्रशासनाने जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेवर आधारित दोन लाख वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी दोन कोटी ६२ लाख इतका खर्च करण्यात येणार असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.

राज्य शासनाने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे जाहीर केले असून त्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला दोन लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाने सात ते आठ फूट उंचीची स्थानिक प्रजातींचे दोन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून या वृक्ष लागवडीसाठी जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेचा आधार घेण्यात येणार आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून या संकल्पनेवर आधारित वृक्ष लागवड करणाऱ्या संस्थेची निवड केली जाणार आहे. तसेच राज्य शासनाने वृक्ष लागवडीसंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये ठाणे शहरात राबविण्यात येणारी मियावाकी संकल्पना सर्वच ठिकाणी राबविण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संकल्पना अशी..

मियावाकी जंगलांचा आकार निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने तीन फूट खोदून माती काढण्यात येते. माती काढलेल्या भाग एकसमान करण्यात येतो. त्यानंतर त्या ठिकाणी शंभर लिटर जीवामृत झारीने पाणी शिंपडण्यात येते. जीवामृत हे गाईचे मलमूत्र, दूध, दही आणि तुपापासून तयार करण्यात येते. खड्डय़ातून बाहेर काढलेल्या मातीतून दगड, विटांचे तुकडय़ांसह काच आणि प्लास्टिक बाहेर काढून त्यामध्ये १५०० किलो भाताचे कूस-कोंडा, १५०० किलो कुजलेले शेणखत टाकतात. तसेच शंभर किलो घन जीवामृत टाकून हे मिश्रण एकत्र करण्यात येते. हे मिश्रण खोदलेल्या खड्डय़ात टाकण्यात येते. खड्डा भरत असताना प्रत्येक एक फूट उंचीवर दोनशे लिटर जीवामृत झारीने शिंपडण्यात येते. त्यावर चारशे झाडे लावून त्यांना बांबूने आधार देण्यात येतो. झाडे लावताना आतील आणि बाहेरच्या बाजूला एक फूट जागा मोकळी सोडण्यात येते. प्रत्येक झाडाला शंभर मिली जीवामृत देण्यात येते. सर्व झाडे लावल्यानंतर उसाच्या पाचरटाचा ६ इंच जाडीचा थर देऊन बाहेरून आतून काथ्याने बांधून घेण्यात येतो आणि त्यावर जीवामृत झारीने शिंपडण्यात येते. अशा पद्धतीने ही वृक्ष लागवड करण्यात येते.

विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड

प्राजक्ता, गुंज, शेवगा, लिंबू, डाळिंब, बहावा, ताम्हण, भोकर, खैर, आंबा, कडुलिंब, बेल, अर्जुन, अंजन, कामिनी, सोनचाफा, टिकोमा, शंकासुर, बिट्टी, कणेर, हिरडा, बेहडा, अडुळसा, अनंत आणि इतर प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कावेसर, ब्रह्मांड, कोलशेत, पारसिक डोंगररांगा, मुंब्रा, कौसा या भागांत  या वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. याशिवाय शहरातील खासगी वसाहती, विशेष नागरी वसाहतींमध्येही ही वृक्ष लागवड केली जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे.