एकीकडे पाणीकपातीमुळे मिळेल तेथून पाणी घेऊन वापरण्याकडे नागरिकांचा भर असताना काविळीसारख्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. बदलापूर पश्चिमेतील काही भागांत गेल्या पंधरा दिवसांपासून काविळीचे रुग्ण आढळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. टँकरमधून होणाऱ्या दूषित पाण्यामुळे हा आजार बळावल्याचे बोलले जात असून, त्यासंदर्भात नगरपालिकेने जनजागृतीदेखील सुरू केली आहे.
बदलापूर पश्चिमेतील मोहनानंदनगर, शनिनगर, मांजर्ली, कैलासनगर या परिसरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये ८ ते १० नागरिकांना कावीळ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, काही अंशी होणारी पाणीकपात आणि त्यामुळे बिघडणारे पाण्याचे गणित सांभाळण्यासाठी अनेकांनी टँकरच्या पाण्याचा पर्याय निवडला. मात्र हे टँकरचे पाणी आता काविळीचा आजार होण्याला कारणीभूत ठरत आहे. अनेकदा पाण्याचे टँकर हे उल्हास नदीच्या मोकळ्या भागातून भरले जातात. बदलापूर चौपाटी किंवा ढोके दापिवली येथील बारवीच्या प्रवाहातील पाण्यावर अनेकदा टँकरचालक डल्ला मारताना दिसतात. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगून त्याची विक्री केली जाते. मात्र, हे करताना पाण्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. अशा प्रकारच्या पाण्याच्या सेवनामुळेच काविळीचा फैलाव झाल्याचे मत कुळगाव बदलापूर पालिकेच्या रुग्णालयाचे डॉ. राजेश अंकुश यांनी व्यक्त केले. याबाबत पालिकेकडून सध्या बॅनरच्या माध्यमातून काविळीच्या लक्षणांची माहिती पोहोचवली जात असून कावीळ रोखण्यासाठी घरच्या घरी शक्य त्या काळजीची माहिती घरोघरीही जाऊन देण्यात येते आहे. तसेच कावीळ जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी जनजागृती सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.