जव्हार नगरपरिषदेचे शतक

मुंबई शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेले परंतु उपेक्षित असलेले पालघर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार. या परिसरावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. त्याशिवाय अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाची बाब म्हणजे या जव्हारला संस्थानाची पाश्र्वभूमी लाभली आहे. भूतपूर्व संस्थान अशी या जव्हारची ख्याती आहे. राजाश्रय लाभला तर त्या गावाची प्रगती कशी होते, हे जव्हारच्या उदाहरणावरून लक्षात येईल. दूरदृष्टीचा राजा जव्हारला लाभला, हे समस्त जव्हारकर मंडळीचे भाग्य आहे. असे हे जव्हार आता पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागले आहे. मुळातच प्रदूषणविरहित स्वच्छ मोकळी हवा, वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी इतर ठिकाणच्या तुलनेत अजूनही आपले अस्तित्व टिकवून असलेली हिरवाई या वेगळ्या वैशिष्टय़ामुळे ‘पालघर जिल्ह्य़ाचे महाबळेश्वर’ असे जव्हाचे वर्णन केले जाते.

Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

श्रीमंत यशवंतरावजी मुकणे यांनी येथे जयसागर धरण बांधले. त्यामुळे जव्हारकरांची पाण्याची गरज भागली. नळयोजना, वीजपुरवठा, रस्ते, दवाखाने, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांसारख्या अत्यावश्यक सुविधा राजेसाहेबांनी उपलब्ध करून दिल्या. सुरतेवर चाल करून जात असताना जव्हारच्या शिरपामाळावर शिरपेच देऊन शिवाजी महाराजांचे स्वागत जव्हारच्या तात्कालीन राजाने केले. तो शिरपामाळ जव्हार-नाशिक रस्त्यालगत आजही जव्हारच्या वैभवात भर टाकत आहे. जव्हार शहरात श्रीमंत राजेसाहेबांनी अनेक मंदिरे बांधली. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाला तर जुना राजवाडा येथे असलेले गणेशाचे मंदिर, हनुमान पाइंटलगत असलेले खंडेरावाचे मंदिर, यशवंतनगर (मोर्चा) भागातील महालक्ष्मी मंदिर.

जव्हार तालुक्यात वारली, कोकणा, महादेव कोळी, मल्हार कोळी, क-ठाकूर, म-ठाकूर, कातकरी या आदिवासी समाजाचे लोक आहेत. आदिवासींचे सांस्कृतिक जीवन वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून समोर येते, त्यात प्रामुख्याने बोहाडा हा उत्सव होय. आज बोहाडा प्रकार नाशिक जिल्ह्य़ातील पेठ, हरसूल, सुरगाणा या गावांशिवाय जव्हार व मोखाडा येथे पाहायला मिळतो. देवदेवतांची मुखवटे तोंडाला बांधून वाद्यांच्या गजरात, मशालीच्या (टेंभा) उजेडात बेभान नाचणारे आदिवासी पाहिले की, मन तितकेच बेधुंद होते. याशिवाय जव्हारला परंपरा लाभली आहे. ती शाही दसऱ्याची. दसऱ्याचा सोहळा पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक जव्हारला येतात. पूर्वी जव्हारला दसऱ्याच्या दिवशी श्रीमंत राजेसाहेबांची सिंहासनावर बसून मिरवणूक निघत असे. दरबारी सेवक, संस्थानांच्या मानदंड, तारपा नृत्य, ढोलनाच डोळ्यांचे पारणे फेडत असे. आज काळाच्या ओघात या गोष्टी नसल्या तरी जव्हारचा शाही दसरा आजही तितकाच उत्साहात साजरा केला जातो.

जव्हार शहरातील प्रसिद्ध स्थळांशिवाय आसपासही प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाला तर जव्हारपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेला दाभोसा या गावातील धबधबा. हा धबधबा पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येतात. दाट जंगल, पक्ष्यांची किलबिल आणि धबधब्याचा आवाज, नीरव शांतता अनेक पर्यटकांना मोहित करते. दाभोसा येथील धबधब्यानंतर डोमझरा, हिरडपाडा व काळमांडवी येथील धबाधबाही सुंदर आहेत. काळमांडवीचा धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते. दरीची उतरण उतरून जेव्हा धबधब्यासमोर येतो, तेव्हा इतर धबधबे क्षुद्र आहेत याची जाणीव होते. पर्यटन खात्याने जर हा धबधबा विकसित केला, तर पर्यटक सर्व धबधबे विसरतील, याची खात्री आहे. याशिवाय येथे भूपतगड किल्ला जव्हारलगत १५ किलोमीटर अंतरावर झाप गावाजवळ आहे. इतिहासाच्या खुणा आता तुरळक असल्या तरी मोखाडा, शहापूर, वाडा, जव्हार व डहाणू या सर्व तालुक्यांच्या सीमा या गडावर गेल्यानंतर दिसतात.

निसर्ग, हवामान, पर्यटनस्थळे या सर्व बाबींशिवाय जव्हारचे एक अजून वैशिष्टय़ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सासुरवाडी येथे होती. चिपळूणकर हे सावरकरांचे सासरे. विलयतेला जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजेसाहेबांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. सावरकरांनी आपल्या वक्तृत्वाचे धडे गिरवले ते जव्हारच्या हनुमान पॉइंटवरच. सावरकरांशिवाय साहित्यिक गं. बा. सरदार यांची जन्मभूमी जव्हारचीच. माजी खासदार प्रा. राम कापसेही जव्हारचे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी जव्हारचे नाव देशभर गाजवले आहे.