नाटय़ संमेलन अध्यक्ष जयंत सावरकर यांचे प्रतिपादन

मी आजवर ११० नाटकांतून विविध भूमिका साकारल्या. त्यांतील अमुकच भूमिका जास्त भावली असे मला सांगता येणार नाही. प्रत्येक भूमिका मी मन:पूर्वक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांत डावे-उजवे करता येणार नाही. मला नाटकांत काम करण्यातून जे सुख मिळाले त्याची किंमत करता येणार नाही, असे उद्गार ९७व्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी येथे काढले. छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात त्यांची ही प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या सहा दशकांच्या नाटय़क्षेत्रातील कारकीर्दीचे सिंहावलोकन केले. आपल्या नट म्हणून झालेल्या जडणघडणीत दामू केंकरे हे माझे गुरू होते. तर त्यांच्याखेरीज अनेक जण मला गुरुस्थानी होते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मला पहिल्यापासूनच मनापासून नट व्हायचे होते; परंतु शाळेत असताना माझी ही इच्छा पुरी होऊ शकली नाही. मात्र, पुढे मुंबईत आल्यावर चाळीच्या गणेशोत्सवात मला ही संधी मिळाली. त्या माझ्या कामाची स्तुती झाली आणि त्यात काम करणाऱ्या बाळ मला विजया जयवंत (विजया मेहता) यांच्याकडे घेऊन गेले. इथून माझा नाटय़प्रवास सुरू झाला. पण थेटपणे नट न होता सुरुवातीला बॅकस्टेज आर्टस्टि, प्रॉम्प्टर, किरकोळ भूमिका ते पूर्ण लांबीच्या मोठय़ा भूमिका असा प्रदीर्घ प्रवास मला करावा लागला. यश मिळण्यासाठी मला मोठी प्रतीक्षा करावी लागली, पण त्यामुळेच मला त्याची किंमत पुरेपूर कळली, असे सावरकर म्हणाले. माझी अनेक नाटके तोंडपाठ असल्याने मी अनेक नाटकांतून, आयत्या वेळी कुणा नटाच्या ऐवजी उभे राहायची वेळ आली तर सहजगत्या त्या भूमिका निभावून नेल्या. यात मी कसलाही त्याग किंवा कुणावर उपकार केले असे मला वाटत नाही, तर त्यातून मला आनंद मिळाला  या दृष्टीने मी त्याकडे पाहतो, असे सांगून ते पुढे म्हणाले की, म्हणूनच आज मी संमेलनाध्यक्ष होऊ शकलो. आपले सासरे आणि नटवर्य मामा पेंडसे यांच्या तालेवारपणाचे आणि नि:स्पृहतेचे काही किस्सेही त्यांनी सांगितले. ‘सूर्यास्त’मधील गायकवाड आणि ‘एकच प्याला’मधील त्यांच्या गाजलेल्या स्वगतांनी या मुलाखतीचा समारोप झाला.

सूर चतन्याचे घुमले आभाळी

येथे भरलेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाकरिता खास एक ‘थीम साँग’ ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

आनंदाच्या गजराने

दुमदुमली नगरी सारी

हा नाटय़कर्मीचा मेळा

या तुळजाईच्या दारी

हे गाणे अत्यंत आकर्षक आणि श्रवणीय असल्याने रसिकांचे चित्त वेधून घेते. हे संमेलनगीत प्रत्येकाच्या ओठी लगेचच रुळले. काहींनी तर या गाण्याचा रिंगटोन म्हणून वापर केला आहे. नाटय़ संमेलनाच्या इतिहासातील हे असे पहिलेच गीत आहे. कवी वैभव देशमुख यांनी लिहिलेल्या या गीताला केदार दिवेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. संगीत संयोजन गौरव कोरेगावकर यांचे असून, ते अवधूत गांधी यांनी गायले आहे. नाटय़ संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात या संमेलनगीताने रसिकांची वाहवा मिळवली.