दागिन्यांची दुकाने लुटण्याची तिसरी घटना; चोरटय़ांना अद्याप अटक नाही

भिंतीला भगदाड पाडून सराफांचे दुकान लुटण्याची गेल्या दीड वर्षांतील तिसरी मोठी घटना घडल्याने सराफांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी नायगावच्या चामुंडा ज्लेवर्समध्ये अशाच पद्धतीने प्रवेश मिळवून चाळीस लाखांचे दागिने लुटण्यात आले होते. अद्याप पोलिसांनी या टोळीला अटक केली नसल्याने पोलिसांविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

नायगावच्या जुचंद्र रोज येथे सोमवारी दुपारी श्री चामुंडा ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात ४० लाखांचे दागिने लुटण्यात आले होते. चोरांनी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि दुकानातील १ किलोहून अधिक वजनाचे दागिने लुटून नेले. गेल्या दीड वर्षांत अशा प्रकारे सराफाचे दुकान लुटण्याची ही तिसरी घटना आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये विरारच्या गोकुळधाम येथील ओंकार ज्वेलर्स अशाच पद्धतीने लुटून अडीच कोटींचे दागिने लुटण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांतच आगाशी येथील मीनाक्षी ज्वेलर्समध्ये १ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली होती. श्री चामुंडा ज्वेलर्समध्ये पडलेल्या दरोडय़ाबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळूनही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

यामुळे पोलिसांविरोधात सराफांचा असंतोष खदखदत आहे. सराफांचे दुकान लुटणाऱ्या टोळ्यांना पोलीस अटकाव करू शकत नाही तसेच त्यांच्याकडून मालाची वसुली करू शकत नाही असे विरार ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रवी पुरोहित यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत पोलिसांनी अटक केलेल्या चोरांकडून केवळ ५ टक्के मालाची वसुली केली असे ते म्हणाले. पोलीस बळ कमी असल्याने सराफांना दुकानाचे संरक्षण करण्यास सांगितले जाते याबाबतही सराफ व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भिंतीला भगदाड पाडून चोरी

दुकानाच्या शेजारील गाळा भाडय़ाने विकत घ्यायचा आणि रात्रीच्या वेळी भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश करून लूट करायची अशी ही पद्धत आहे. अशा प्रकारे लूट करणारी विशिष्ट टोळी असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. त्यामळे पोलिसांच्या या निष्क्रियतेविरोधात मंगळवारी नायगावमधील सराफांनी एक दिवसांचा बंद पाळून निषेध नोंदविला होता.

पोलिसांचा धाक असता किंवा त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर सराफांचे दुकान लुटण्याची कुणाची हिंमत झाली नसती.

सराफ व्यापारी.