कल्याण : येथील गोविंदवाडी भागातील महापालिकेच्या आसरा करोना काळजी केंद्रात उपचार घेत असलेल्या एका महिलेचे ९७ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे करोना काळजी केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण येथील बापगावमधील एक महिलेला करोनाची लागण झाली. त्यामुळे ती गोविंदवाडी वस्तीतील आसरा फाऊंडेशनमधील करोना काळजी केंद्रात उपचार घेत आहे. या महिलेच्या अंगावर दागिने होते आणि त्यासोबत काही रक्कम होती. चोरटय़ांनी तिच्या अंगावरील ९७ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली असून या चोरीबाबत त्या महिलेने मुलाला माहिती दिली. त्यानुसार त्याने दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. बी. म्हस्के करीत आहेत. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांनी मात्र प्रत्येक काळजी केंद्रात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यामुळे असे प्रकार होत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असे सांगितले.