इंदगाव येथील आश्रमावर हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले नगरसेवक आशीष दामले यांच्या बचावासाठी सोमवारी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ठाण्यात अवतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंदगाव येथील नरेश रत्नाकर यांच्या आश्रमावर केलेल्या हल्लाप्रकरणी त्यांची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणात दामले निर्दोष असल्याचा दावा केला. दामले यांनी आश्रमावर हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना निलंबित केल्याचे जाहीर केले होते. यासंबंधी पक्ष स्तरावर ठोस निर्णय होण्यापूर्वीच आव्हाड यांनी दामले यांची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बदलापूरजवळील इंदगाव येथील आश्रमावर हल्लाप्रकरणी आश्रमाचे सर्वेसर्वा रत्नाकर यांनी दामले यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी दामले यांच्यावर एक लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा तसेच रत्नाकर यांची पुतणी पल्लवी रत्नाकर हिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पल्लवी रत्नाकर हिने आपले अपहरण झाले नव्हते, असा जबाब पोलिसांकडे नोंदविल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. यानंतर उल्हासनगर येथील न्यायालयाने दामले यांच्यावरील अपहरणाचे कलम काढून टाकले व दामले यांच्या सहकाऱ्याने न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून रत्नाकर यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात अद्यापही पोलिसांचा तपास सुरू असल्याने राष्ट्रवादीने अद्याप दामले यांना पक्षात प्रवेश दिलेला नाही. मात्र, दामले यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेत आव्हाड उपस्थित होते. आव्हाड यांनी दामलेंची बाजू घेत रत्नाकर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच आशीष दामले यांना या प्रकरणात गोवण्यात आले असून ते निर्दोष आहेत, असा दावाही त्यांनी केला.