महाविकास आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांतील नेते एकमेकांना टोले लगावताना दिसतात. त्यावरून बरीच चर्चा रंगते. अशीच चर्चा रंगली आहे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून आव्हाडांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यांच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कल्याणमधील रस्त्यांबाबत भाष्य केलं. “कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही. तरुणांनी काही तरी विचार केला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कुठेही नसतील,” असं म्हणत आव्हाड यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांबद्दल प्रश्न उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांविषयी भाष्य केलं. त्यावेळी कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे व्यासपीठावर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कित्येक वर्षांपासून शिवसेना व भाजपाची सत्ता आहे. महत्त्वाचं म्हणजे कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याने शिवसेनेला टोला लगावल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र की स्वतंत्र?

पुढील काही महिन्यांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो, असं स्थानिक राजकीय जाणकारांना वाटतं. अंबरनाथमध्ये काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयीच बोलताना “येणाऱ्या काळात काय होईल हे सांगता येत नाही. परंतु, आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टीका करता येत नाही. येणारा काळ अवघड असून युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा”, असं आवाहन केलं होतं. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की, तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.