फनिक्युलर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

विरार : विरारचे प्रमुख पर्यटक आकर्षण असलेल्या आणि महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या जीवदानी देवी मंदिरास फनिक्युलर रेल्वे प्रकल्पाची परवानगी मिळाली आहे. लवकरच ही सेवा भाविकांसाठी सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून चाचण्या सुरू आहेत.

विरार येथील जीवदानी देवी मंदिर हे समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर आहे. या मंदिरात १४०० पायऱ्या आहेत. या मंदिरात जाण्यासाठी सध्या आबालवृद्धांना पायऱ्या चढाव्या लागतात, पण आता ही फनिक्युलर रेल्वे झाल्यानंतर भक्तांना दिलासा मिळणार आहे. फनिक्युलर रेल्वेची ही सेवा जगभरातील काही मोजक्याच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आहे.  लहान मुलांसाठी ही सेवा मोठे आकर्षण ठरणार आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यवसायाला यामुळे चालना मिळेल, असा विश्वास जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला. विरार भागात अनेक देवदेवतांची मंदिरं असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने भक्तांना काही पॅकेज देता येईल का, याचाही विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी ३२ ते ३५ कोटी रुपये खर्च  आला असून जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने हा खर्च केला आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सव्र्हिस या कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून हिरवा कंदील दिला आहे.  येत्या महिन्याभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत येईल, असे ट्रस्टचे सचिव प्रदीप तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.  या रेल्वेत एका वेळी १०४ भाविकांना  घेऊन जाता येर्ईल. एका फेरीसाठी या रेल्वेला सात मिनिटे लागतात. ही रेल्वे तासाभरात १२ फेऱ्या मारेल. दिवसभरात ही रेल्वे १२ ते १४ तास धावू शकते. ही पूर्णत: विजेवर चालणार असल्याने पर्यावरणाला याचा कोणताही धोका नाही.  अद्याप या सेवेचे भाडे निश्चित झाले नसले तरी भाविकांना परवडतील असेच दर ठेवले जातील ,अशी माहिती श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली.

फनिक्युलर रेल्वे म्हणजे काय?

डोंगराळ भागात किंवा एखाद्या कड्यावर  केबलच्या साहाय्याने ही रेल्वे चालवली जाते. या रेल्वेच्या डब्यांखाली आऱ्यांसारखी रचना असते. त्यातून ही केबल किंवा चेन टाकलेली असते. ते आरे फिरायला लागल्याने त्या केबलच्या माध्यमातून ही रेल्वे पुढे सरकते. उंच चढाच्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो.