News Flash

सेवाव्रत : जिव्हाळा तुमचा आणि आमचा

विशेष मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘जिव्हाळा' ही संस्था ठाण्यात गेल्या दहा वर्षांपासून विशेष मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.

विशेष मुलांचे संगोपन हा त्यांच्या आईवडिलांपुढील मोठा प्रश्न असतो. पालक आपापल्या परीने ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. अधिकाधिक संवेदनशील नागरिकांनी सामाजिक भावनेतून अशा पालकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते. आहे. ‘जिव्हाळा’ ही संस्था ठाण्यात गेल्या दहा वर्षांपासून विशेष मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासंस्थेविषयी..

प्रत्येकाचे आयुष्य जगण्याबाबत एक कल्पना असते. एक स्वप्न असते. बहुतेक सर्वाना बंगला, गाडी, परदेशात वास्तव्य असावे असे वाटते. मात्र तिचे स्वप्न वेगळे होते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होत असतानाच समाजातील विशेष मुलांसाठी काम करण्याचा निर्णय तिने घेतला. बहिणीकडून या विशेष मुलांसाठीच्या अभ्यासक्रमाची माहिती तिला मिळाली होती. तिचे नाव जयश्री भोगटे-रुके. स्पेशल एज्युकेटरचा अभ्यासक्रम, बीएड पूर्ण केल्यानंतर ठाण्यातीलच श्रीमाँ स्नेहदीप या विशेष मुलांच्या शाळेत तिने १९९३ ला नोकरीला सुरुवात केली. याकाळात या मुलांच्या प्रश्नाची तिला खऱ्या अर्थाने जाणीव झाली. त्यातील अनेक मुलांना किमान दैनंदिन व्यवहार करण्याबरोबरच स्वत:च्या पायावर उभे राहाता यावे यासाठी विशेष प्रयत्न करायचा तिने निर्णय घेतला. मुदलात ठरवूनच या क्षेत्रात पाय ठेवल्यामुळे वेगळे काहीतरी करावे असे तिला सतत वाटत होते. ही वाटचाल सोपी नव्हती. त्यात अनेक गुंते होते. संस्थेला मुल मिळण्यापासून आर्थिक पाठबळाचा आणि जागेचा प्रश्न होता. अशा प्रकारच्या सामाजिक कार्याची वाट किती काटय़ाकुटय़ातून जाते याची जाणीव त्यांना हळू हळू होऊ लागली. परंतु तिचा निर्धार पक्का होता. ‘समाजात वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या बहुतेकांना मग ते महर्षी धोंडो केशव कर्वे असोत की महात्मा फुले असोत, प्रत्येकाला उपेक्षा आणि त्रासाचा सामना करावा लागला आहे. मी तर एक सामान्य स्त्री आहे.’ जयश्री रुके सांगत होत्या.
‘सुरुवातीला म्हणजे २००६ मध्ये गडकरी रंगायतनसमोर एका छोटय़ाशा जागेत ‘जिव्हाळा’ संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांसाठीचा ‘उभारी’ प्रकल्प सुरू केला. आधी अवघी दोनच मुले होती. मुले यावीत यासाठी अशा मुलांच्या पालक व संस्थांशी संपर्क साधू लागलो. त्याच वेळी गडकरी रंगायतन येथे ज्या माणसाने जागा दिली त्याने फसवणूक करून जागा काढून घेतली. पुन्हा एकदा जागेसाठी श्रीगणेशा सुरू झाला. नेमक्या त्याच वेळी निलेश शेंडकर यांच्या मदतीने जीतेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील ‘संघर्ष’ संस्थेची जागा आम्हाला मिळाली. याच जागेत गेली नऊ वर्षे आमचा ‘जिव्हाळ्या’चा संसार सुरूआहे. या वाटचालीत डॉ. दिलराज कडलस, रोशनी रुके, माझे पती राजेश अशा अनेकांची मोलाची साथ मिळाली. सध्या या संस्थेत अठरा वर्षांवरील ११ मुले आहेत. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, किमान आपण काहीतरी उद्योग करू शकतो या जाणिवेतून त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा माझ्यासाठी मोठा आहे,’ जयश्री रुके सांगतात.
या मुलांच्या आनंदात तुम्हीही सहभागी होऊ शकता. त्यांना जमेल तशी मदतही करू शकता. काहीजण आपल्या मुलांचे वाढदिवस येथे साजरे करतात. काही या मुलांनी बनविलेल्या अगरबत्तीपासून पेपर प्लेटपर्यंतच्या वस्तू खरेदी करतात, पण ही संख्या तशी कमीच आहे. शाळेतील दोन्ही शिक्षिका शीला खेडेकर व शुभांगी परब या आईच्या मायेने मुलांसाठी काम करतात. खरेतर काम करतात हा शब्द तसा चुकीचाच आहे. कारण या संस्थेची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे या शिक्षकांना योग्य वेतनही देता येत नाही, याची खंत जयश्री रुके यांनी बोलून दाखवली. साधारण अठरा ते पंचवीस वयोगटांतील या मुलांना घडवणे हे एक आव्हान आहे. अगरबत्ती बरोबर कागदी द्रोण व पेपर प्लेट बनविण्याचे काम ही मुले करतात. यासाठी दोन यंत्रेही घेण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे दिवाळीनिमित्त पणत्यांपासून वेगवेगळ्या आकर्षक वस्तूही येथे बनविल्या जातत. याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशामधून या मुलांना वर्षांतून दोनदा मानधन दिले जाते. वर्षांतून दोन-तीन वेळा या मुलांसाठी सहलही काढली जाते. अर्थात यातील बहुतेक सहली या कोणी ना कुणी प्रायोजित केलेल्या असतात. दिवाळी येथे वेगळ्या पद्धतीने साजरी होते. तो एक आनंद मेळावा असतो. पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, भार्गवी चिरमुले हे कलावंत आमच्या दिवाळीत आवर्जून सहभागी झाल्याचे जयश्रीताईंनी सांगितले.
सकाळी ११ ते चार अशी या शाळेची वेळ आहे. मुलांना पूर्वी त्यांच्या घरून रिक्षाने संस्था स्वखर्चाने आणत व पोहोचवत असे. आता महापालिकेने ठाणे स्टेडियममधील या जागेचे भाडे वाढविल्यामुळे तेच देणे अवघड झाले आहे. शाळा या मुलांच्या पालकांकडून अवघे दीडशे रुपये महिना घेते. आता मुलांना स्वखर्चाने शाळेत यावे लागते. यातील काही मुलांच्या पालकांची रिक्षाने दररोज मुलांना शाळेत सोडण्याची क्षमताही नाही. महापालिका निष्ठुर बनली आहे. पैसे भरा नाहीतर शाळेला टाळे लावतो अशा नोटिसावर नोटिसा पाठवत आहे. वर्षांचे ६५ हजार भाडे थकले आहे ते भरले नाही तर शाळा कधी बंद पडेल ते सांगता येत नाही अशी सध्याची स्थिती आहे. मदतीसाठी जयश्री रुके यांनी सर्वच राजकीय पक्षांचे दरवाजे झिजवले आहेत. स्टेडियममधील जागा हवे तर काढून घ्या आणि त्या ऐवजी किमान एखाद्या पालिका शाळातील दोन वर्गखोल्या तरी द्या, ही त्यांची विनवणी जेव्हा कोणालाच ऐकू येत नाही, तेव्हा मतिमंद-गतिमंद कोण आहे हा प्रश्नच निर्माण होतो. खरेतर शासन व महापालिकांनी समाजातील अशा विशेष मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. दुर्दैवाने त्यांच्यासाठी ना पुरेशा शाळा आहेत ना सोयी-सुविधा आहेत. अशा वेळी या मुलांना मायेचा ‘जिव्हाळा’ देणाऱ्यांना समाजानेच साथ दिली पाहिजे.

जिव्हाळा, उभारी विकलांग व मतिमंद विद्यार्थ्यांची व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा, दादोजी कोंडदेव स्टेडियम, गाळा क्रमांक ८, ठाणे पश्चिम.
’ जयश्री रुके-९९८७२६७२९४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 12:10 am

Web Title: jivhala trust working for special children upbringing
टॅग : Special Children
Next Stories
1 शाळेच्या बाकावरून : झंडा उँचा रहे हमारा..
2 फुलपाखरांच्या जगात : राज्य फुलपाखरू
3 वाचक वार्ताहर : प्रवाशांची गैरसोय दूर होईल काय?
Just Now!
X