08 April 2020

News Flash

‘जोशी-बेडेकर’चा ‘रासगरबा’ यंदापासून बंद

सामाजिक भान म्हणून महाविद्यालयाने घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाविद्यालयाचा निर्णय

मनोरंजनासोबत विद्यार्थ्यांमध्ये परंपरेची जपणूक रुजवावी, या हेतूने ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित करण्यात आलेला रासगरबा कार्यक्रम यंदापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर-जानेवारी या महिन्यांच्या काळात होणाऱ्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाचे वैशिष्टय़ असलेला आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणून या रासगरब्याची ओळख होती. मात्र, या कार्यक्रमामुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाविद्यालयाने या वर्षीपासून हा रासगरबा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, रास गरबा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असली, तरी सामाजिक भान म्हणून महाविद्यालयाने घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या नवरंग महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धाची रेलचेल असते. या महोत्सवाच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या डेजचे आयोजन केले जाते. पूर्वी जोशी-बेडेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डीजे आयोजित केला जायचा. पाच वर्षांपूर्वी डीजे बंद करून महाविद्यालयात पारंपरिकतेची ओळख करून देणारा रासगरबा साजरा करण्यात येऊ लागला. संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन महाविद्यालयाच्या पटांगणात गरब्याचा आनंद लुटत असतात. नवरंग महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत येऊन रासगरब्यात मोठय़ा प्रमाणात सहभागी होत असतात. या वर्षीपासून मात्र मोठय़ा आवाजातील संगीताने ध्वनिप्रदूषण होत असल्याने महाविद्यालयाचा गरबा बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. बहुतेक महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये सध्या मोठय़ा आवाजात संगीत लावून विद्यार्थी बेधुंदपणे नाचताना दिसतात. यात विद्यार्थ्यांकडून काही गैरवर्तन घडण्याची शक्यता असते. महोत्सवादरम्यान खूप मोठय़ा संख्येने विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणे कठीण जाते. डीजे किंवा गरबा याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण स्पर्धाचे आयोजन महोत्सवात होत असते. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन व्यक्तिमत्त्व विकास करावा यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. महोत्सवाच्या दरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी व्यवस्थापनाचा निर्णय विद्यार्थ्यांना सांगितल्यावर विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला असला, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य निर्णयाला विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे.

नवरंग महोत्सवातील इतर उपक्रमांचा विद्यार्थ्यांना व्य्क्तिमत्त्व विकासासाठी नक्कीच उपयोग होत असतो. या स्पर्धामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी कलेला प्रोत्साहन द्यावे. ध्वनिप्रदूषण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

डॉ. विजय बेडेकर, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

‘विद्यार्थ्यांना नवरंग महोत्सवातील रासगरब्याचे आकर्षण असते. विद्यार्थी उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहत असतात. यंदाच्या वर्षीपासून रासगरबा बंद होत असल्याचे सकारात्मक कारण प्राचार्यानी समजावून सांगितल्यावर विद्यार्थ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.’

मयूरी रेडीज, विद्यार्थिनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 3:18 am

Web Title: joshi bedekar college take decision to close raas garba due to noise pollution
टॅग College,Decision
Next Stories
1 आंबेडकर स्मारकाचे काम पालिकेच्या खांद्यावर
2 लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवासाची मुभा द्यावी!
3 विशेष मुलांच्या बागडण्याने शाळेचे पटांगण खुलले
Just Now!
X