बंद करण्याची मागणी; नवा पूल गैरसोयीचा ठरत असल्याची तक्रार

वसई : नवीन पूल गैरसोयीचा आणि जूना पूल धोकादायक अशा कोंडीत नायगावचे रहिवासी सापडले आहेत. नायगावच्या रहिवाशांना अनेक वर्षे धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने नवा पूल बांधून दिला. मात्र हा पूल गैरसोयीचा ठरत असल्याने अनेक नागरिक जुन्याच पुलाचा वापर करीत आहेत.

नायगाव खाडीवरील नवीन पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र अधिक पायऱ्या चढून जावे लागत असल्याने नागरिक जुन्याच पुलाचा वापर करीत आहेत. या लोखंड पुलाचे कठडे गंजले असून काही भाग तुटलेला आहे, तरीही प्रशासनाने या पुलाची ना डागडुजी केली ना हा पूल जाण्या-येण्यासाठी बंद केला. त्यामुळे नागरिक जुन्या पुलावरून जीव मुठीत घालून प्रवास करीत आहेत.

प्रशासनाने जेव्हा नवीन पूल सुरू केला त्या वेळेस जुना पूल बंद करणे गरजेचे होते आणि तशा प्रकारचा फलक किंवा नोटीस त्या ठिकाणी लावणे आवश्यक होते. प्रशासनाने कोणत्याही प्रकारे लक्ष न दिल्याने नागरिकांचा या पुलावरून प्रवास सुरूच आहे. हा पूल जर तुटला मोठी दुर्घटना घडू शकते, असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा पाय पुलाच्या तुटलेल्या कठडय़ात अडकून जखमी झाला होता.

जुना पूल हा अतिशय जर्जर झाला आहे व जास्त प्रामाणात नागरिक या पुलावरून प्रवास करीत आहेत. जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे यासाठी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्याशी पत्रव्यवहार करून धोकादायक जुना पूल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिक धोकादायक जुन्या पुलावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे पालिकेने आता तो कायमस्वरूपी बंद करण्याचे ठरवले आहे. जुन्या पुलाची पाहणी करून आणि सार्वजनिक बांधकाम  खात्याशी चर्चा करून जुना पूल बंद करण्यात येईल.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका