News Flash

पोलीस चौकी राष्ट्रीय सणांपुरतीच

चौकीत पोलीस कर्मचारी वा अधिकारी उपस्थित नसल्याने परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली जूचंद्र येथील पोलीस चौकी बंद आहे.

स्वातंत्र्य, प्रजासत्ताक दिन वगळता जूचंद्रची पोलीस चौकी वर्षभर बंद
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली जूचंद्र येथील पोलीस चौकी बंद आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी पूर्णवेळ उघडी असणाऱ्या या चौकीकडे वर्षभर साधा पोलीस कर्मचारीही फिरकत नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
वसईमधील नायगाव पूर्वेला झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. पूर्व पट्टीतील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन माणिकपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून वालीव या स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. या वालीव पोलीस ठाण्याचे जूचंद्र येथे पोलीस चौकी उभारली आहे. परंतु ही पोलीस चौकी कायमस्वरूपी बंद असल्याचे येथील रहिवासी सांगतात.
या चौकीत पोलीस कर्मचारी वा अधिकारी उपस्थित नसल्याने परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळाले आहे. नागरी वस्ती मोठय़ा प्रमाणात असलेल्या या परिसरात भरदुपारी घरफोडय़ा व भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अमली पदार्थाच्या विक्रीचा व्यवसायही येथे सर्रास सुरू असतो. सायंकाळी वा रात्री एकटय़ाने जाणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटनांही अलीकडे वाढत आहेत. नुकतीच या चौकीच्या हद्दीत रश्मी स्टार सिटी या इमारतीत एकाच रात्री ८ घरफोडय़ा झाल्या होत्या तसेच एका सुरक्षारक्षकाची हत्याही करण्यात आली होती. या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वी या चौकीत पोलिसांचा वावर असायचा. मात्र तेही ‘तक्रारपुस्तिका नाही, अदखलपात्र गुन्हा नोंदवही नाही’ अशी कारणे देऊन तक्रारी दाखल करण्यास टाळाटाळ करीत असत, असा अनुभव एका महिलेने सांगितला. आता ही पोलीस चौकी वर्षांतून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी उघडली जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. तसेच चौकीतील कर्मचारी गस्तीवर असल्याने ती बंद असते, असे येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:35 am

Web Title: juchandra police station close at whole year
Next Stories
1 एसटीच्या आडमुठेपणामुळे परिवहन सेवेची वाट बिकट
2 दफनभूमी आरक्षणाविरोधात म्हाडा आक्रमक
3 ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करभरणा प्रक्रियेत सुधारणा
Just Now!
X