ज्यूली बेट नष्ट होण्याच्या मार्गावर; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

बेकायदा रेती उत्खननामुळे विरारच्या नारिंगी खाडीतील ज्यूली बेट नष्ट होऊ  लागले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने वाळूमाफियांविरोधात काहीच कारवाई न केल्याने आत संतप्त ग्रामस्थांनी खाडीत उतरून बेट वाचवण्यासाठी जलआंदोलन केले. सुमारे चार तास हे जलआंदोलन सुरू होते. गावातील महिलाही चार तास पाण्यात उभ्या होत्या.

वसई आणि पालघर तालुक्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडलेला आहे. वसई तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या वैतरणा खाडीत सक्शन पंप लावून मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा केला जात असतो. या वाळूउपशामुळे विरार पूर्वेकडील ज्यूली बेटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विरारच्या नारिंगी गावाजवळ ५०० एकरचे ज्यूली बेट. नारिंगी ग्रामस्थ या बेटावर भातशेती आणि मत्स्यव्यवसाय करत असतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते. परंतु बेकायदा वाळूउपशामुळे हे बेट खचत चालले असून ते नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्यूली बेटावर तिवरांची झाडे आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. हे बेट नष्ट झाले तर परिसरातील गावातील शेती व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याविरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी बुधवारी सकाळी आंदोलनाला सुरुवात केली. शंभरहून अधिक महिला आणि पुरुष खाडीतील पाण्यात उतरले आणि हे जलआंदोलन सुरू केले. जोपर्यंत वाळूमाफियांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी साडेबारापर्यंत सुरू होते.

रेल्वे पुलालाही धोका

नारिंगी खाडीवर पश्चिम रेल्वेचे ८८, ९०, ९१, ९२ आणि ९३ क्रमांकाचे पूल आहेत. वैतरणा, शिरगाव, आणि कसराळी या परिसरात हे रेल्वे ब्रीज आहेत. बेकायदा रेती उत्खननामुळे या पुलालाही धोका निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी सक्शन पंपाने रेतीउपसा करण्यासाठी उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, पण रेती व्यावसायिक आणि महसूल, पोलीस व रेल्वे प्रशासनाच्या अर्थपूर्ण व्यवहारांमुळे या ठिकाणी राजरोस वाळूउपसा होत असल्याचा आरोप नारिंगी गावातील रमेश पाटील यांनी केला आहे.

..तर जलसमाधी घेऊ!

वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करून हे बेट वाचवण्या साठी बेकायदा रेती उत्खनन बंद करण्याची मागणी केली. मात्र प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ज्यूली बेट जर नष्ट झाले तर आम्ही बेरोजगार होऊ. आमची पारंपरिक शेती संपून जाणार आहे. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आम्ही जलआंदोलन केले आहे. यावरही प्रशासनाने लक्ष नाही दिले तर आम्ही जलसमाधी घेऊ, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.