शहराच्या मध्यवर्ती भागात दीड एकरचा वनपट्टा शाबूत; वडवली विभागात लवकरच जैवविविधता उद्यान

मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने विस्तारणाऱ्या अंबरनाथ शहरातील वडवली या मध्यवर्ती परिसरातील दीड एकरच्या जंगलात लवकरच नक्षत्र उद्यान साकारले जाणार असून त्यानिमित्ताने अंबरनाथकरांना वनविहाराचा आनंद घेता येणार आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व विभागात वडवली येथे भरवस्तीत हा जंगल पट्टा अद्याप सुदैवाने टिकून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील माती उत्खनन करून नेली जात होती. याशिवाय डेब्रिज टाकले जाऊ लागल्याने येथील हिरवाई हळूहळू नाहीशी होऊन त्याला कचराभूमीचे स्वरूप येऊ लागले होते. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेऊन बदलापूर विभागाचे वनक्षेत्र अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी या परिसराचे सर्वेक्षण केले. त्यात ही जागा वनविभागाचीच असल्याचे सिद्ध झाले आहे.

वाढत्या नागरीकरणाच्या रेटय़ातही अंबरनाथ परिसरात बऱ्यापैकी निसर्ग श्रीमंती टिकून आहे. वडवलीतील जंगलपट्टा त्यापैकी एक असून ती जागा संरक्षित करण्यासाठी वन विभाग, पालिका प्रशासन यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वेक्षणानंतर लगेचच वन विभागाने इथे फलक लावले असून त्याद्वारे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे परिसरातील बहुतेक वन जमिनी उजाड झाल्या असल्या तरी येथील हिरवाई अद्याप टिकून आहे. अंबरनाथमध्ये उद्यानांची वानवा आहे. स्थानिकांना फिरण्यासाठी फारसे चांगले पर्याय नाहीत. त्यामुळे वन विभागाने ही जागा उद्यानासाठी उपलब्ध करून द्यावी, यासाठी स्थानिक नगरसेविका वीणा पुरुषोत्तम उगले गेली तीन वर्षे प्रयत्न करीत आहेत. या नक्षत्र उद्यानामुळे शहराच्या पूर्व विभागातील नागरिकांना फिरण्यासाठी एक उत्तम जागा उपलब्ध होईल. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना वृक्षवेलींची माहिती करून देण्यासाठी इथे या जागेचा वापर करता येईल.

अंबरनाथ शहरातील वडवली विभागातील दीड एकरचे जंगल कायदेशीर बाबींची पूर्तता करून नक्षत्र उद्यानासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द केली जाईल.

राजेंद्र कदम, मुख्य वन संरक्षक, ठाणे विभाग.

शहरात उद्यानांची कमतरता आहे. त्यामुळे वडवली विभागातील जंगलपट्टा ताब्यात घेतले जाईल. त्यासाठी पालिका प्रशासन वनविभागासोबत तातडीने योग्य ते सोपस्कार पार पाडेल.

देविदास पवार, मुख्याधिकारी, अंबरनाथ पालिका.