कोणत्याही व्यवसायात खेळाकडे फक्त रुटीन म्हणून पाहिले जाते. खेळामुळे शरीर निरोगी बनते. सध्याच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण आयुष्यात खेळ ही एक मोठी गरज आहे, असे प्रतिपादन बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गट्टा हिने व्यक्त केले. ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या इनडोअर क्रीडा भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्वाला गट्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. त्या वेळी तिने उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलने विद्यार्थ्यांना आता शिक्षणाबरोबरच तिरंदाजी, रायफल नेमबाजी, लॉन टेनिस, बास्केटबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, मैदानी खेळ, बुद्धिबळ, सेल्फ डिफेन्स, पोहणे, स्केटिंग आदी खेळांसाठी विद्यार्थ्यांना अधिक मोठे क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी १०,००० चौ. फूट क्षेत्रफळ जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर क्रीडा भवन उपलब्ध करून दिले आहे. या क्रीडा भवनाचे उद्घाटन आघाडीची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना ज्वाला म्हणाली की, सिंघानिया स्कूल आणि स्पोर्ट्स इग्नाइटचे मी त्यांच्या या संकल्पनेसाठी हार्दिक अभिनंदन करते. मला या शाळेतून भविष्यातील उत्कृष्ट क्रीडापटू पाहण्याची इच्छा आहे. आपल्या देशात क्रीडा संस्कृती आवश्यक असून त्यात स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. खेळ तुम्हाला नेहमी आनंदी ठेवतात. मला खेळाडू म्हणून येथे आल्यावर खूप प्रेरणा मिळाली आहे. पालकांनी कोणतीही असुरक्षिततेची भावना मनात न बाळगता मुलांना खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे. मी भारताला एक क्रीडा राष्ट्र म्हणून पाहू इच्छिते. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या संचालिका आणि प्राचार्या श्रीमती रेवती श्रीनिवासन या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होत्या.