काब्रा गॅलक्सी स्टार-३, घोडबंदर रोड, ठाणे (प.)

घोडबंदरमध्ये गगनाला गवसणी घालणाऱ्या उंच इमारतींमधील अनेक रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांनी दिलेली आश्वासने न पाळल्याचा आरोप केला आहे. अलीकडेच काब्रा गॅलक्सी स्टार-३ सोसायटीमधील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाच्या जाचाविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात काब्रा गॅलक्सी स्टार-३ संकुल आहे. डिसेंबर २०१२ मध्ये १४ मजल्याच्या ‘आल्या’ आणि ‘गार्नेट’या दोन इमारती बांधण्यात आल्या. या दोन्ही इमारतींत १०७ सदनिका आणि १६ गाळे आहेत. गेली तीन वर्षे बांधकाम व्यावसायिक इमारतीतील सभासदांना सोसायटीची नोंदणी करण्यास विरोध करत होता. मात्र, त्या विरोधाला न जुमानता अखेर फेब्रुवारी २०१७ मध्ये  सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सोसायटीचे कामकाज सुरू झाले. सोसायटी स्थापन झाल्यापासून रहिवाशांचा एकमेकांशी संवाद वाढला. त्यातून आपुलकी आणि परस्परांबद्दल विश्वास निर्माण झाल्याचे मीनल कुलकर्णी सांगतात.

सोसायटी स्थापन झाल्यानंतर संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला. ब्रह्मांडमधून दरवर्षी गुम्ढी पाडव्याला मोठी शोभायात्रा निघत असते. मात्र, एकमेकांशी ओळख नसल्याने आम्ही फक्त घरांच्या खिडक्यांमधूनच शोभायात्रा पाहायचो. यंदा मात्र आम्ही त्यात सहभागी झालो. एकमेकांना भारतीय नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. आमच्यापैकी बहुतेकांना उत्साहाने पारंपरिक वेश परिधान केले होते. थोडक्यात काय एकमेकांमध्ये असलेल्या अदृश्य भिंती दूर होऊन गुढीपाडव्याला आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र आलो, असे ज्योत्स्ना भोरकर यांनी सांगितले.

उत्सवांची नांदी

१५ ऑगस्ट या दिवशी संकुलातील मुलांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचे ठरवले. या वेळी प्रत्येकाच्या कलागुणांची खरी ओळख आम्हाला पटली, असे सोसायटीचे अध्यक्ष संग्रामसिंह महाडिक यांनी सांगितले. अनेक तरुण मुले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांत नावाजलेले असल्याचे या वेळी सगळ्यांना समजले.

बांधकाम व्यावसायिकाविरोधात आंदोलन

१६ सप्टेंबरला येथील सर्व रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिक काब्रा यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी मूक आंदोलन केले. त्या वेळी रहिवाशांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. विकासकाने देखभाल शुल्काची काही रक्कम थकवली आहे. रहदारीच्या रस्त्यावरील पथदिवे नादुरुस्त आहेत. काही सदनिकांमध्ये पाणी गळते. टाइल्स निखळल्या आहेत. इमारतीच्या दर्शनी भागात लावलेल्या काचा खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या पडून अपघात होण्याची शक्यता आहे. अवघ्या चार वर्षांत इमारतीची अशी अवस्था झाल्याने दुरुस्तीचा ८० टक्के खर्च विकासकाने करावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. रहिवाशांच्या आंदोलनानंतर येत्या आठवडाभरात सदनिकाधारकांची भेट घेण्याचे आश्वासन विकासकाने दिल्याचे सोसायटीचे अध्यक्ष महाडिक यांनी सांगितले.

संकुलाचे उद्यानही वादात

संकुलासाठी एक उद्यान बनविण्यात आले आहे. मात्र, येथून पालिकेचा रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प जात असल्याने हे उद्यान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संकुलातील सदनिकाधारकांकडून या उद्यानाच्या देखभालीचा खर्च घेतला जात आहे. अशा पद्धतीने अनधिकृत जागेत उद्यान बनविलेच कसे असा रहिवाशांचा प्रश्न आहे.

दिवे असूनही अंधार

इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे पथदिव्याचा प्रकाश रोखला जातो. त्यामुळे दिवे असूनही या भागात रात्री अंधार असतो. प्रकाशाच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्या लागणार आहेत. याविषयी पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहारही केला आहे. मात्र तरीही फांद्या छाटल्या जात नाहीत, अशी रहिवाशांची तक्रार आहे.