|| सागर नरेकर

पक्षादेश झुगारून १० नगरसेवकांचे शिवसेनेला मतदान :- राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविता यावा यासाठी अडीच वर्षांपूर्वी कलानी कुटुंबीयांना सत्तेचे कवच प्राप्त करून देणाऱ्या भाजपला शुक्रवारी महापौर निवडणुकीत ओमी कलानी यांनी शिवसेनेच्या मदतीने धूळ चारल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कलानी कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली होती. हा राग मनात असलेल्या ओमी कलानी यांनी राज्यातील बदलती सत्ता समीकरणे लक्षात घेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संधान साधले. पक्षातील जुन्या जाणत्यांचा विरोध असतानाही कलानी कुटुंबीयांना आपलेसे करणाऱ्या भाजपला ओमी यांनी धक्का दिल्याचे मानले जात आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या दहा कलानी समर्थक नगरसेवकांनी ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशान यांना मतदान केले. त्यामुळे भाजप आणि साई पक्षाचे उमेदवार जीवन इदनानींचा पराभव झाला. पक्षादेश झुगारून या नगरसेवकांनी मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपचे नेते कोकण आयुक्तांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, राज्यातील नव्या सत्तासमीकरणामुळे उदयास येणाऱ्या नव्या सत्तेचा लाभ नगरसेवकांना दिले जाईल, असा शब्द शिवसेना नेत्यांकडून ओमी कलानी यांना दिला गेल्याचे वृत्त आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शहापूर-भिवंडी महामार्गावरील शान्ग्रीला रिसॉर्ट येथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ओमी कलानी यांच्यात झालेल्या बैठकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती पक्की करण्यात आली होती.

कलानी समर्थक नगरसेवकांना आपल्याकडे ओढत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, भारिप नगरसेवकांची मोट बांधली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भिवंडीतील एका हॉटेलमध्ये या सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यात आले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी रात्री ४३ नगरसेवकांची मोट बांधल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे महापौर पदाचा निकाल रात्रीच लागल्याची चर्चा होती.

गोंधळातच प्रक्रिया पूर्ण

सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू होताच पराभव दिसू लागल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी गोंधळ घालत सर्व नगरसेवकांना जागी बसवण्याचे आदेश देण्याची मागणी पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांना केली. आम्ही या जागी सुरक्षित असल्याचे सांगत फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेच्या गोटात बसणे पसंत केले. तासभर सुरू झालेल्या या गोंधळानंतर अखेर मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्या वेळी शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पीआरपी अशा एकूण ४३ नगरसेवकांनी शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांच्या पारडय़ात मते टाकली, तर साई पक्षाच्या जीवन इदनानी यांना ३५ मते मिळाली. त्यासोबत रिपाइंचे भगवान भालेराव यांना ४४ मते मिळाल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

विधानसभेचा वचपा

उल्हासनगर महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला डावलून सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला साई पक्षाची साथ मिळाली होती. त्यामुळे सत्तेचे गणित भाजपला सोडवता आले होते. त्यात ओमी कलानी समर्थकांची साथही महत्त्वाची होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने ओमी यांची आई ज्योती कलानी यांना डावलले. त्यामुळे कलानी समर्थक  नाराज होते. तेव्हाच महापौरपदाच्या निवडणुकीत ज्योती कलानी  यांच्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्णय कलानी समर्थकांनी घेतला होता.