News Flash

ग्रामस्थांचा विरोध डावलून काळू धरणाचे काम?

माती परीक्षणासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात; मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चा

माती परीक्षणासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात; मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चा

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांचा भविष्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मुरबाड तालुक्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणासाठी माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून याबाबतची निविदा भातसा धरण व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्याला परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून या निर्णयाविरोधात गुरुवारी मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला.

स्थानिकांच्या विरोधामुळे आणि कायदेशीर प्रक्रियेतले टप्पे गाळल्यामुळे अकरा वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यातील काळू धरणाचे काम ठप्प झाले होते. मात्र धरणाच्या उभारणीला २०२० मध्ये जोर आला. त्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून  ग्रामस्थांनी विरोधाचे हत्यार उपसले आहे. ऑक्टोबर अखेरीस येथील ग्रामस्थांनी धरण उभारणीसंदर्भात पाहणी, सर्वेक्षण किंवा काम करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावांमध्ये प्रवेशबंदी केली होती. काही दिवसांपासून पुन्हा या धरणाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नुकतीच धरणाच्या उभारणीतला एक भाग म्हणून माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे. मुरबाड तालुक्यातील खापरी गावाजवळ विंधनविवरे  खोदण्याच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने भातसा धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ही निविदा जाहीर केली आहे. यातून निघालेल्या मातीचे परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ग्रामस्थांचे आक्षेप

’ प्रस्तावित धरणक्षेत्रातील सर्व बाधित ग्रामस्थांचा विरोध असताना आणि कोणतीही नवी कायदेशीर अधिसूचना काढली नसतानाही ट्रायर बोअर अर्थात विंधनविवरे खोदण्याची निविदा कशी जाहीर केली असा आक्षेप स्थानिकांनी घेतला आहे.

’ यापूर्वीही बेकायदेशीरपणे विंधनविवराचे काम करत प्रत्यक्ष धरणाच्या भिंतीचे २० टक्के कामही करण्यात आले होते. त्यामुळे आधी जर हे काम झाले असेल तर आता पुन्हा का आणि त्याची कारणे कोणती ते स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

’ केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाच्या ३४ अटींची पूर्तता न करता काम कसे सुरू झाले, असा आक्षेप ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

’ तसेच या परिसरात आदिवासींसाठी विशेष तरतुदी लागू असून त्यासह भूसंपादन कायद्याची कोणतीही पूर्तता अद्याप केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 2:16 am

Web Title: kalu dam work start despite villagers protests zws 70
Next Stories
1 माजिवडातील कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक बदल
2 अवैध मद्यविक्रीवर कारवाई
3 पर्यायी मार्गाशिवाय रेल्वेमार्गावर संरक्षक भिंत
Just Now!
X