मजूर नसल्यामुळे काम लांबणीवर

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका विविध क्षेत्रांना बसला असतानाच याच कारणामुळे ठाणे आणि कळवा या शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम लांबणीवर पडल्याची बाब समोर आली आहे. या पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य टाळेबंदीच्या काळात परराज्यातून शहरात येऊ शकले नाही आणि अनेक कामगार करोनाच्या भीतीने मूळ गावी निघून गेले. त्यामुळे पुलाचे काम सहा महिन्यांपासून मंदावले आहे.

ठाणे आणि कळवा या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी एक ब्रिटिशकालीन खाडीपूल जुना झाल्याने तो काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या खाडीपुलावरून सध्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाल्याने या पुलावर वाहनांचा भार वाढून कोंडी होऊ लागली. ती कमी करण्यासाठी महापालिकेने तिसरा खाडीपूल उभारणीचे काम काही वर्षांपूर्वी सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु विविध परवानग्या आणि काही तांत्रिक कारणांस्तव हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात डिसेंबर २०२० पर्यंत हा पूल पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी पुलाच्या कामाचा वेगही वाढविण्यात आला होता.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली. तसेच करोनाच्या भीतीने अनेक कामगार मूळ गावी निघून गेले. त्यामुळे पुलाच्या कामासाठी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला. तसेच गुजरात आणि दमण येथून पुलाच्या कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य मागविण्यात आले होते; परंतु टाळेबंदीमुळे हे साहित्य शहरात येऊ शकले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पुलाचे काम मंदावले आहे. या संदर्भात महापालिकेचे उपनगर अभियंता प्रवीण पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. पुलाच्या कामासाठी परराज्यातून येणारे साहित्य शहरात आणण्यासाठी विशेष परवानग्या मिळविल्या होत्या. त्यामुळे काही साहित्य आले तर काही साहित्य येऊ शकले नाही. तसेच गेल्या महिनाभरापासून पुलाचे काम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

कामे अपूर्ण

कळवा तिसरा खाडी पुलाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून २५ टक्के कामे अद्याप शिल्लक आहेत. त्यामध्ये पुलाच्या खांबांवर गर्डर टाकणे, खाडी पुलाचे दोन भाग गर्डर टाकून जोडणे, पुलाच्या मार्गिकांसाठी रस्ता करणे आणि इतर कामे आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी साडेतीन महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी इतक्या कमी कालावधीत हे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या डिसेंबर महिन्याच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण होणे शक्य नाही, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.