न्यायालयीन शिक्षेसंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप
कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांनी महापालिका सेवेत दाखल होण्यासाठी भरलेल्या अर्जामध्ये न्यायालयाच्या शिक्षेसंबंधीची माहिती दडवल्याची बाब समोर आली आहे.
डॉ. खडसे यांच्या निष्काळजीमुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदवून त्याच्या पालकांना भरपाई म्हणून ४ लाख २४ हजार रुपये देण्याचे आदेश यवतमाळ न्यायालयाने दिले होते. मात्र, महापालिकेत अधिष्ठतापदासाठी अर्ज दाखल करताना डॉ. खडसे यांनी ही माहिती भरली नव्हती. अशा प्रकारची माहिती दडविल्याचे आढळून आली तर संबंधितांची सेवा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे महापालिकेने अर्जाच्या अटी व शर्तीमध्ये म्हटले होते. नेमका हाच धागा पकडून मनसेने डॉ. खडसे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने त्यांचे पद धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालय इमारत धोकादायक असून पुढील पाच वर्षांत कधीही पडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्यावरून सर्वसाधारण सभेतही मोठा वादंग झाला होता. तसेच रुग्णालय इमारतीच्या संरचनात्मक स्थिती समाधानकारक असून इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय व्हीजेटीआयने संरचनात्मक परीक्षण अहवालाच्या आधारे दिल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने केला होता. त्यामुळे डॉ. खडसे या तोंडघशी पडल्याचे चित्र होते. असे असतानाच महापालिका सेवेत दाखल होण्यासाठी डॉ. खडसे यांनी अर्ज भरताना न्यायालय शिक्षेसंबंधीची माहिती दडविल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या अधिष्ठता पदासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज मागविले होते. त्यानुसार डॉ. खडसे यांनी अर्ज भरला होता. या अर्जामध्ये उमेदवारास पूर्वी फौजदारी अथवा दिवाणी प्रकरणात शिक्षा झाली होती का किंवा सद्य:स्थितीत त्यांचेवर फौजदारी अथवा दिवाणी गुन्हा दाखल आहे का असल्यास तपशील लिहावा, असे म्हटले होते. या प्रश्नाच्या पुढे त्यांनी नाही असा उल्लेख केला आहे. मात्र, यवतमाळ न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना भरपाई देण्याची शिक्षा सुनावली होती. या संदर्भातील माहिती त्यांनी अर्जात दडविल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. संध्या खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे कारण दिले.
खडसेंचे आरोप प्रशासनाने फेटाळले
ठाणे महापालिकेच्या छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा दावा अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांनी केल्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. मात्र, रुग्णालय इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले असून या अहवालानुसार इमारतीची स्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने केला आहे. याशिवाय, या अहवालानुसार इमारतीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर केल्याचा दावा करत डॉ. खडसे यांनी केलेले आरोप प्रशासनाने फेटाळून लावले. रुग्णालय इमारतीच्या बांधकामाचे परीक्षण महापालिकेच्या पॅनलवरील संस्थेकडून करून घेण्यात आले आहे. या संस्थेकडून प्राप्त झालेला संरचनात्मक परीक्षण अहवालाबाबत व्हीजेटीआय या संस्थेकडून अभिप्राय घेण्यात आला होता. या संस्थेने रुग्णालयाच्या इमारतीची संरचनात्मक स्थिती समाधानकारक असून इमारतीची वेळोवेळी दुरूस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची संरचनात्मक आणि इतर दुरुस्तीसंबंधीचे प्रस्ताव जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आले असल्याचेही महापालिकेनेही स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 4:35 am