कामे वेगाने करण्याचे आयुक्तांचे आदेश; अभियांत्रिकी विभागाकडून डिसेंबरची मुदत

कळवा, साकेत, विटावा या भागांसह ठाणे शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम येत्या डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कळव्यातील वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी या पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून दबाव येत आहे. या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुलाचे काम तसेच विटावा-कळवा पुलावर मंदगतीने सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.

ठाणे आणि कळवा या शहरांना जोडण्यासाठी तिसऱ्या खाडीपुलाच्या उभारणीचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे सुरुवातीला निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध परवानग्या मिळण्यात विलंब झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यासच विलंब लागला. त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याचे अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. या पुलाच्या कामामुळे कळवा परिसरातील वाहतूक कोंडी वाढली असून याचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीलाही बसत आहे. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने आता प्रशासनाने झपाटय़ाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी दिले आहेत. यासाठी पुलाचे काम सुरू असतानाच त्याच्या मजबुतीची तपासणी करण्यासाठी त्यावर ‘बांधकाम आरोग्य तपासणी यंत्रणा’ (नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सिस्टम) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शास्त्रीय पद्घतीने ही यंत्रणा पुलाच्या आरोग्याची तपासणी करणार असून त्याआधारे प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे पुलावर वाहनांचा पडणारा ताणतणाव आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे संभाव्य अपघात टाळणे शक्य होणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.

वाहतूक कोंडीचा त्रास

ठाणे आणि कळवा-मुंब्रा या शहरांना जोडण्यासाठी सद्य:स्थितीत दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी एक ब्रिटिशकालीन असून त्याचे आयुर्मान संपल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या खाडीपुलाच्या बांधकामास वीस वर्षांचा काळ लोटला असून या पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. ब्रिटिशकालीन पूल बंद करण्यात आल्यामुळे दुसऱ्या खाडीपुलावरील वाहनांचा भार वाढून या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यातच नवीन पुलाच्या कामामुळे विटावा, कळवा भागांत वाहतुकीची मोठी कोंडी होत असून सकाळ, सायंकाळ गर्दीच्या वेळेत सद्य:स्थितीत असलेला कळवा पूल ओलांडणे प्रवाशांसाठी दिव्य होऊन बसले आहे.

नवी यंत्रणा कशी?

  • ‘नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सिस्टम’चे सेन्सर पुलाच्या बांधकामादरम्यान बसवण्यात येतील.
  • पुलाची पायाभरणी करतानाच हे सेन्सर बसवण्यात येतील.
  • या सेन्सरमुळे पुलाच्या खालील हालचालींच्या आधारे त्याच्या मजबुतीची नोंद केली जाणार आहे.
  • भविष्यातही या पुलाला एखादा धोका निर्माण झाल्यास पालिकेला सेन्सरद्वारे त्याची पूर्वसूचना मिळू शकेल.
  • ही यंत्रणा जुन्या खाडीपुलावर बसवण्याचाही प्रशासनाचा विचार होता. मात्र, ते तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.