News Flash

पाण्यासाठी जीवघेणी रूळवारी!

सध्या दररोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पाण्याची भांडी घेऊन रूळ ओलांडणारे रहिवासी दिसून येतात.

कळव्यातील भास्कर नगरमधील धक्कादायक वास्तव; उपाययोजना कागदावरच

किशोर कोकणे, ठाणे

दुष्काळाच्या झळा सोसत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी व्याकूळ होत असतानाच, ठाणे शहरातील परिस्थितीही भयाण होऊ लागली आहे. ठाणे शहरातील काही भागांसह दिव्यातील पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच कळव्यातील भास्करनगर परिसरातील रहिवाशांना पाणी मिळवण्यासाठी रेल्वेचे रूळ ओलांडून वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी या परिसरातील एका दहा वर्षीय मुलीचा रूळ ओलांडताना मृत्यू झाल्यानंतर या विभागाचा पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु वर्ष उलटले तरी, भास्करनगरातील रहिवाशांची जीवघेणी ‘रूळ’वारी सुरूच आहे.

कळवा शहराच्या विविध भागांत सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. भास्करनगर, वाघोबानगर भागातील पाण्याचे दुर्भिक्ष तर बारमाही आहे. या परिसरात चार ते पाच दिवसांतून एकदा दोन ते अडीच तास पाणी सोडले जाते. याउलट या वस्तीलगतच्या रुळांपलीकडील परिसरात सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा केला जातो. भास्करनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने या वस्तीला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दररोज रूळ ओलांडून पलीकडच्या परिसराकडे धाव घेतात. सध्या दररोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पाण्याची भांडी घेऊन रूळ ओलांडणारे रहिवासी दिसून येतात.

सुमारे तीन वर्षांपूर्वी या परिसरातील परवीन आलम ही दहा वर्षांची मुलगी पाणी आणण्यासाठी रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत तिचा मृत्यू झाला होता. यावरून प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवताच पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी भास्करनगरचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची घोषणा केली होती. परंतु या घटनेला तीन वर्षे उलटल्यानंतरही भास्करनगरमध्ये पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.

याच भागात राहणाऱ्या फातिमा शेख यांचे रमझान महिन्यातील उपवास सुरू आहेत. मात्र सायंकाळी उपवास सोडताना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता दररोज भरदुपारी त्यांना रूळ ओलांडून जावे लागते. ‘अंगात त्राण नसतात, पण पाणी भरण्यासाठी जावेच लागते. कधी अपघात होईल, याची खात्री नाही. त्यामुळे मुलांना पाठवण्यास मन धजावत नाही,’ असे त्या सांगतात. फातिमा आपल्या मुलांना पाणी भरण्यासाठी पाठवत नसल्या तरी, परिसरातील काही लहान मुलांना तशी सवलत मिळतेच असे नाही. ‘आम्ही लहान मुले दररोज पाणी भरण्यासाठी रुळांपलीकडे जातो. काही वेळा अपघात होतात. पण त्यांची नोंदही होत नाही, असे वडीलधारे सांगतात,’ असे समशेर नावाच्या १५ वर्षीय मुलाने सांगितले. पूल बांधला तर आम्हाला पाणी आणणे सोयीचे होईल, असे तो सांगतो.  नईउद्दीन शेख यांना रमझानच्या उपवासामुळे दररोज ३० लिटर पाण्याची बाटली खरेदी करावी लागते. ‘पिण्याचे पाणी भरून आणण्याइतकी शक्ती नसते. अपघातांचा धोका असतोच. भुर्दंड सोसावा लागतो,’ असे ते म्हणतात.

पाणीटंचाई कशामुळे?

भास्करनगर येथील वस्तीमध्ये अडीच हजार लोकसंख्या आहे. या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रेल्वे रुळांखालून गेलेली आहे, मात्र ती कमी व्यासाची असल्यामुळे परिसराला कमी दाबाने किंवा चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. रुळांखालून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी रेल्वे आणि वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हे काम रखडत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

धोका काय?

हे रहिवासी जेथून रूळ ओलांडतात, त्याच्या काही फूट अंतरावर वळण आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाडय़ा अनेकदा दिसत नाहीत. त्यामुळे येथे अपघात होतात. या ठिकाणी रेल्वे पूल व्हावा यासाठी आम्ही स्थानिकांनी अर्जही केला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 2:02 am

Web Title: kalwa residents crossing the rail route to get water
Next Stories
1 मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावर लुटारूंची टोळी
2 बदलापूरच्या जांभूळ आख्यानाची अखेर?
3 विकासकाची हत्या करणाऱ्यास १६ वर्षांनंतर अटक
Just Now!
X