संचालक मंडळाच्या मनमानीला कंटाळून सभापतींचा राजीनामा
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी बाजार समितीमधील काही संचालकांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा दिला. बाजार समितीमध्ये सभापतींकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचे काम या संचालकांनी सुरू केले होते. केवळ स्वहित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीचा कारभार सुरू असल्याचे निदर्शनास येताच, आमदार किसन कथोरे यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती.
आमदार कथोरे यांच्या मागणीची दखल घेत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले. कल्याण बाजार समितीमध्ये एकूण १७ संचालक आहेत. वार्षिक पाच कोटींची उलाढाल समितीमध्ये होते. वर्षांनुवर्षे ठरावीक सभापती आणि संचालकांचा कारभार बाजार समितीमध्ये होता. याशिवाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती असे समितीचे नामाभिधान असले तरी त्यामधील बहुतांशी व्यापारी परप्रांतीय आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या साचेबद्ध कारभाराला नवीन वळण आणि शेतकरीभिमुख बाजार समिती करण्याचा प्रयत्न गेल्या १५ महिन्यांपासून सभापती रवींद्र घोडविंदे यांनी चालविला होता. कल्याण, शहापूर, मुरबाड परिसरांतील अधिकाधिक शेतकऱ्यांना फळ, फूल विक्रीचे परवाने देणे. त्यांना समिती सदस्य करून घेणे. त्यांच्या मालाला समिती आवारात प्राधान्य देणे, समितीच्या आवारातील गाळ्यांमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक व्यवसाय कसा करता येईल, या विधायक विचारातून सभापती घोडविंदे काम करीत होते. गेल्या दीड वर्षांत फूल बाजार, शेळी मेंढी बाजाराचे प्रश्न घोडविंदे यांनी मार्गी लावले. या सरळमार्गी कारभारामुळे वर्षांनुवर्षे बाजार समितीत संचालक म्हणून ठाण मांडून असलेल्या काही संचालकांच्या पोटात दुखू लागले होते. आपल्या अस्तित्वाला सभापती घोडविंदेकडून धोका निर्माण होण्याची भीती वाटू लागल्यानंतर घोडविंदे यांच्यावर काही संचालकांनी आरोप करून त्यांना सभापतिपदावरून हटविण्यासाठी अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
बाजार समितीमधील विकासकामांच्या प्रस्तावांमध्ये अडथळे आणून सभापती रवींद्र घोडविंदे यांची कोंडी करण्यास काही संचालकांनी सुरुवात केली. अखेर समितीत काम करणे अवघड झाल्याने घोडविंदे यांनी पदाचा राजीनामा गेल्या आठवडय़ात दिला. घोडविंदे यांची सभापतिपदाची मुदत १८ नोव्हेंबपर्यंत होती. बाजार समितीची मुदत २०१६ मध्ये संपली होती. परंतु, शेतकरी, व्यापारी हिताचा विचार करून आमदार किसन कथोरे यांनी शासनाकडून तीन वेळा या समितीची मुदत वाढवून घेतली होती. बाजार समितीमधील संचालकांची मनमानी वाढत गेली. काम करणे अशक्य होत असल्याचे लक्षात येताच चार महिन्यांपूर्वी आपण आमदार कथोरे यांच्याकडे सभापतिपदाचा राजीनामा दिला होता, असे घोडविंदे यांनी सांगितले.
सेना-राष्ट्रवादीला धक्का
बाजार समितीमध्ये भाजपचा वरचष्मा होता. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या संचालकांनी एकत्र येऊन भाजपच्या सभापतींना हटविण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु तत्पूर्वीच राजीनामा देऊन सभापती घोडविंदे यांनी सेना-राष्ट्रवादीच्या खेळीला सुरुंग लावल्याची चर्चा आहे. आपल्यात फाटाफूट होऊ नये म्हणून १२ संचालक केरळला गेले असल्याचे समजते.
दलाल वृत्तीने काही संचालक बाजार समितीत काम करतात. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या वर्षांनुवर्षांच्या उद्योगात अडथळे येत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या विरुद्ध अविश्वास ठराव आणणे, हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. तत्पूर्वीच आपण पदाचा राजीनामा दिला. पणनमंत्र्यांनी बाजार समिती बरखास्त केली. शेतकरी हित समोर ठेवून बाजार समितीचा विकास झाला पाहिजे या आपल्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न काही संचालकांनी केला. – रवींद्र घोडविंदे, माजी सभापती, कल्याण कृषी बाजार समिती
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 12:30 am