कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला पुन्हा एकदा विरोधाचे ग्रहण लागले असून रस्त्याच्या कडेला वसलेल्या बेकायदा गाळेधारकांनी आक्रमक भूमिका घेत रुंदीकरणाला विरोध केल्याने या कामातील अडथळे आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू व्हावे यासाठी रस्त्याची आखणी करण्यासाठी गेलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गाळेधारकांनी आक्रमक भूमिका घेत रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने महामार्गाची रुंदी दोन्ही बाजूस १०० फुटांपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अडथळे निर्माण झाले आहेत. कल्याण-बदलापूर राज्यमहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखणीप्रमाणे करायचे की नगरपालिकेच्या विकास आराखडय़ाप्रमाणे करायचे हा प्रश्न उद्भवल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते. याबाबत नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे, अंबरनाथ नगरपालिकेचे तसेच येथील प्रांताधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग नियोजन प्राधिकरण नसल्याने नगरपालिकेच्या विकास आराखडय़ाप्रमाणे रस्ते आखणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधी केलेली आखणी फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर रस्ते आखणीसाठी गेलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने हा प्रश्न चिघळला आहे. व्यापाऱ्यांच्या काही प्रतिनिधींनी या प्रश्नावर न्यायालयात पुन्हा दाद मागितली आहे, अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी दिली. जव्हार-वाडा-कल्याण-कर्जत या ७६ क्रमांकाच्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सद्य:स्थितीत सुरू असून अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातून यापैकी चार किलोमीटर अंतराचा मार्ग जातो. या रस्त्यावर तब्बल १०७३ अतिक्रमणे असून त्यांच्यावर कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य महामार्गालगत असलेली जवळपास हजार अनधिकृत बांधकामे तोडण्याचा निर्णय यापूर्वी सरकार दरबारी झाला आहे. मात्र, हा निर्णय मान्य करण्यास येथील व्यापारी तयार नसून पंधरा-वीस वर्षांपासून बांधलेले गाळे तोडण्यास व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. नगरपालिकेच्या विकास आराखडय़ाऐवजी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आखणीच रस्त्यासाठी मान्य केली जावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रश्नी गाळेधारकांच्या संघटनेचे अध्यक्ष नवीन शहा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका आमच्याकडे मांडली असून जुनी रस्ते आखणी कायम ठेवण्याची त्यांची मागणी आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनुसार रस्ते आखणीबाबत निर्णय झाला आहे. तरी, पालिकेच्या विकास आराखडय़ाप्रमाणेच ही रस्ते आखणी होणार आहे. परंतु, सध्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी न्यायालयात गेले असून २५ मे ला उशिरा याबाबत निकाल आल्यावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
भालचंद्र गोसावी, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan badlapur highway
First published on: 26-05-2015 at 01:40 IST