गणेशोत्सवातील फलकांमुळे शहरे विद्रुप, वाहतुकीलाही अडथळा
बेकायदा फलकबाजीविरोधात कडक मोहीम राबवण्यासंबंधी न्यायालयाने दिलेले आदेश पायदळी तुडवून ठाणे, कल्याण, डोंबिवलीत राजकारण्यांच्या फलकबाजीचा उत्सव सुरू झाला आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपली छबी फलकांवर झळकवत सामान्य कार्यकर्त्यांपासून मोठमोठय़ा नेत्यांपर्यंत साऱ्यांमध्येच परिसर विद्रुप करण्याची स्पर्धा सुरू असल्याने शहरांवर अवकळा पसरली आहे. या फलकबाजीमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. शहरातील पोस्टरबाजीबद्दल खुद्द महापालिका आयुक्तांना दोषी धरण्याचा उल्लेख न्यायालयाच्या आदेशात करण्यात आला आहे. असे असताना मुख्य रस्ते खोदून उभारण्यात आलेल्या जाहिरातींच्या कमानी, पोस्टरबाजकडे पालिका अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.
गणेशोत्सवानिमित्ताने उभारण्यात येणाऱ्या मंडपाबरोबरच स्वागत कमानी, होल्डिंग, बॅनरच्या माध्यमातूनही उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. शहरात वाहतुकीला अडथळा ठरेल अशा स्वरूपाच्या स्वागत कमानी उभारण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांच्या बॅनर्सनी शहरातील महत्त्वाचे चौक आणि गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातील परिसरात गर्दी केली आहे. यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना त्रास होण्याबरोबरच शहरांचे विद्रुपीकरणही होत आहे. कल्याण-डोंबिवली शहरामध्ये निवडणुकीचा काळ असल्याने या भागात तर पोस्टर आणि बॅनर्सनी उच्चांक गाठला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकातील गणेश मंडळाने बॅनर्सचा भरमसाठ उपयोग केला आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर स्वागत कमानी उभारल्या असून त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत आहे. तर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील गणेश मंदिरासमोर शंभर मीटरच्या अंतरावर दहापेक्षा अधिक स्वागत कमानी बांधून नवा विक्रमच येथील मंडळींनी केला आहे. सगळ्या राजकीय पक्ष, अपक्ष आणि निवडणुकीस इच्छुक मंडळींची छबी या कमानींवर आढळून येत आहे.
फुकट आणि विनापरवाना बॅनरबाजीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलेले ठाणे शहर यंदाही पिछाडीवर नाही. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बॅनरबाजी होत असून आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बघ्याची भूमिका घेतली आहे. ठाणे शहरामध्ये रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानींमुळे रस्त्यावरून वाहने जाण्यासाठी जागा देण्यात आली असली तरी पादचाऱ्यांची वाट मात्र रोखली गेली आहे. ठाण्यातील बी केबीन परिसरातील रस्ता अरुंद असून त्यावरून सॅटीसवरील बस गाडय़ांची वाहतूक होते. त्याच वेळी नागरिकांना रस्त्याने चालावे लागते. अशा वेळी बस किंवा नागरिक दोन्हींपैकी एक जाऊ शकतील अशा कमानी लावल्याने सगळ्यांनाच त्रास होत आहे. सॅटीसवरून उतरण्याच्या ठिकाणीही रिक्षा चालक संघटनेच्या मंडळींनी बॅनर्स लावून वाट आडवून ठेवली आहे.