गेल्या सहा दिवसांपासून पाण्याचा पत्ता नसल्याने नागरिक हतबल; ठिकठिकाणी टँकरच्या पाण्यावर गुजराण
आठवडय़ातील सुटीच्या दिवशी पाण्याचा सर्वाधिक वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विविध शहरांत शनिवार, रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असला तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील अनेक भागांत गेल्या सहा दिवसांपासून पाण्याचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. शनिवारी, रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर सोमवारपासून गुरुवापर्यंत या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कल्याण परिसराला बसला असून नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी उल्हास नदीतून पाण्याचा उपसा करून टँकरने पुरवठा चालू केला आहे. मात्र, या पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने असा पर्याय किती दिवस पुरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांत १ फेब्रुवारीपासून शनिवारी, रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, लघु पाटबंधारे विभागाचे हे नवे वेळापत्रक दुसऱ्याच आठवडय़ात कोलमडून पडले आहे. दोन दिवस पाणी बंद राहिल्यानंतर सोमवारी कमी दाबाने पुरवठा होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना कल्याण पूर्व, पश्चिमेकडील काही भाग, डोंबिवली पश्चिमेकडील काही भाग, कोपर गाव आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात अद्याप पाण्याचा पत्ता नाही. पालिकेचे पंपिंग यंत्र बंद पडल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद होता, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर बुधवार आणि गुरुवारीही अनेक भाग कोरडेच होते. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीकरांना जवळपास आठवडाभर निर्जळी राहावे लागले आहे.
अनेक ठिकाणी संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी आपापल्या विभागात टँकरने पाणीपुरवठय़ाची सोय केली. उल्हास नदीतून उपसा करून हे टँकर नागरिकांना पाणी पुरवत आहेत. मात्र, मुळात उल्हास नदीतच पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने भविष्यात अशी वेळ ओढवल्यास पाणी
कुठून आणायचे, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर उभा ठाकला आहे. ज्या ठिकाणी बोअरवेलने पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मिळेल त्या दरात नागरिक पाणी खरेदी करत आहेत. तर टँकर पुरवठादारांनीही चढय़ा भावाने पाणी पुरवण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांना याविषयी विचारले असता महापालिके कडून एकाही प्रभागास टँकरने पाणी पुरविले गेले नाही, असा दावा त्यांनी केला. महापालिकेकडे पाणीच नाही. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पालिका सर्वतोपरी
प्रयत्न करीत असून गुरुवारी सायंकाळपर्यंत तो सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.