गंधार नगर, कल्याण
tvlo01कल्याण शहराने १९८० च्या दशकात कात टाकण्यास सुरुवात केली. जुने वाडे जाऊन तेथे नव्या इमारती उभ्या राहिल्या. खडकपाडा सर्कल परिसरातील गंधार नगरची पायाभरणीही तेव्हाच झाली; परंतु या भागात सोयीसुविधांचा गंधार ‘सूर’ न लागता, समस्यांनी परिसर ‘बेसूर’ झाला. गंधार नगरच्या प्रवेशद्वारापासूनच समस्यांचा पेटारा उघडत जातो. कल्याणमधील इतर ठिकाणचा परिसर झळाळत असताना गंधार नगरात ‘गटर, वॉटर आणि मीटर’च्या नावाने ठणाणा आहे. त्यामुळे येत्या काळात येथे चांगले रस्ते, प्राथमिक सोयीसुविधा आणि स्वच्छता पाहायला मिळेल, अशी अपेक्षा येथील रहिवाशी करीत आहेत.
ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या कल्याण शहराने १९८० च्या दशकामध्ये कात टाकण्यास सुरुवात केली. जुने वाडे कालबाह्य होऊन तेथे नव्या इमारती उभ्या राहत होत्या. त्याच वेळी शहराबाहेरच्या मोकळ्या भूखंडांवर नव्या इमारती बांधून कल्याण शहराचा विस्तारही वाढू लागला होता. नवे कल्याण म्हणून ओळखला जाणारा खडकपाडा परिसराचा विकास याच काळात झाला. खडकपाडा सर्कल परिसरातील गंधार नगरची पायाभरणीही तेव्हाच झाली. ३० हजार ४८ चौरस मीटर क्षेत्रफळ परिसराचे छोटय़ा ६४ भूखंडांमध्ये विभागणी करून त्याची विक्री करण्यात आली. कल्याण शहरातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि विकासकांनी या भागात बंगले आणि इमारती बांधण्यासाठी जागा घेतल्या आणि गंधार नगर विकसित होऊ लागले. गंधार नगरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन गंधार नगर रहिवासी संघाची स्थापना केली. २५ ते ३० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या गृहसंकुलामध्ये ६० विविध सोसायटय़ा असून या सर्वाचे मिळून २८० सदस्य असलेला गंधार नगर रहिवासी महासंघ आहे. गंधार नगर सांस्कृतिक क्रीडा मंडळ या संस्थेच्या माध्यमातूनही या भागात सांस्कृतिक चळवळ सुरू आहे.
नागरी समस्यांची जंत्री
गंधार नगराच्या प्रवेशद्वारापासूनच समस्यांची यादी सुरू होते. प्रवेशद्वाराचे बांधकाम नगरसेवक निधीतून झाले असले तरी त्याची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती नसल्याने पडझड होऊ लागली आहे. प्रवेशद्वारासमोर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गंधारनगरमध्ये जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. गंधारनगरचे सर्व रस्ते अनेक वर्षांपासून दुरुस्ती केले नसल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. गृहसंकुलाचा विकास झाला, त्या वेळचीच गटारे आताही अस्तित्वात आहेत. ती अत्यंत अरुंद असून स्वच्छता होत नसल्याने ती कायमस्वरूपी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यावर सांडपाणी येण्याचे प्रकार सर्रास होत असतात. पावसाळ्यात गटारे तुंबत असल्याने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात सांडपाणी साठून राहते. त्यातून मार्ग काढणे रहिवाशांना अडचणीचे जाते. महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची नवी योजना आणि विकासकामे या भागात होत नसल्याने रहिवाशांमध्ये एकूणच निराशेचे वातावरण आहे. अपुऱ्या नागरी सुविधांचा फटका या भागातील सुमारे पाच हजार नागरिकांना सहन करावा लागतो. खडकपाडा परिसराचा वेगाने विकास होत असून आजुबाजुच्या गृहसंकुलांना महापालिकेच्या मदतीने नवी झळाळी मिळत आहे. चांगले रस्ते, गटारे, पायवाटा उपलब्ध होत आहेत. मात्र सर्वात जास्त कर देणाऱ्या या रहिवासी संकुलाच्या नशिबी मात्र अनास्थाच आहे. त्यामुळे येथील नागरी समस्या जटिल स्वरूपाच्या आहेत.  
सोनसाखळी चोरी, दरोडे..
कल्याण शहराचा विस्तार वाढला असला तरी पोलीस स्टेशन मात्र केवळ दोनच आहेत. महात्मा फुले पोलीस ठाणे आणि बाजारपेठ पोलीस ठाणे. लोकसंख्या वाढली तरी पोलीस स्थानकांच्या क्षमतेमध्ये कोणतीच वाढ होत नसल्याने गंधारनगर परिसरामध्ये संरक्षणासाठी पोलिसांची एक साधी चौकीसुद्धा नाही. त्यामुळे हा भाग असुरक्षित बनला असून या भागातील रस्ते सोनसाखळी चोरीचा अड्डा बनले आहेत.
गंधारनगरमध्ये येणाऱ्या रस्त्यावरून वेगाने येणारे बाइकस्वार महिलांच्या गळ्यातील दागिने बिनदिक्कतपणे खेचून पळ काढतात तर या भागात  घरफोडय़ांच्या अनेक घटना घडल्याचे येथील नागरिक सांगतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी या भागात पोलीस प्रशासनाने खास पथके नेमून पहारा करण्याची गरज आहे. शिवाय या भागात पोलिसांची चौकी उभारल्यास या भागातून होणाऱ्या सोनसाखळी चोरीवर पुरते र्निबध येऊ शकेल, अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी दीपक ब्रिद यांनी केली.   
अनास्था आणि दहशतही..
विकासांविरोधातील न्यायालयीन लढाईमुळे या भागातील रहिवाशांमध्ये परिसराविषयी कमालीची अनास्था निर्माण झाली असून या भागात विकासकाची दहशत असल्याचा आरोप रहिवासी संघटनेकडून केला जात आहे. या सततच्या संघर्षांमुळे रहिवासी संघामध्ये काहीशी शैथिल्याची भावना निर्माण झाली आहे. तरीही संस्थेचे पदाधिकारी मोठय़ा उत्साहाने या परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.
या भागातील मोकळ्या जागेवरील अतिक्रमण दूर होण्याची गरज असून त्या भागात मोठे मैदान झाल्यास त्याचा वापर या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी होऊ शकेल, असे मत संस्थेचे अध्यक्ष अण्णा बेंद्रे यांनी व्यक्त केले.  

राष्ट्रीय सणांतून एकत्वाची भावना..
गंधार नगर रहिवासी संघाच्या वतीने १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक एकत्र येऊन या भागातील मोकळ्या मैदानामध्ये ध्वजवंदन कार्यक्रम साजरा करतात. या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात. परिसरातील राजकीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यंदाच्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमास कल्याणचे आमदार नरेंद्र पवार उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय सण हेच एकत्र येण्याचे एकमेव निमित्त असल्याचे या सोसायटीचे सदस्य सांगतात.

मैदानासाठी १८ वर्षांचा लढा..
सुमारे ३० हजार ४८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावरील ६४ इमारती पूर्ण झाल्यानंतर १० टक्के भाग म्हणजे ३ हजार ८४ चौरस मीटर क्षेत्रफळाचे मैदान मोकळे ठेवण्याची गरज होती; मात्र या भागातील मैदान एका विकासकाच्या ताब्यात आहे आणि रहिवाशांनी त्या विरोधात जोरदार आवाज उठवला. विकासक आणि रहिवाशांमधील संघर्ष सुरू झाला. न्यायालयीन लढाई सुरू झाली. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून त्या विरोधात रहिवासी संघटनेचा लढा सुरूच आहे. निवडून येणाऱ्या राजकीय नेत्यांचे पुरेसे सहकार्य होत नसल्याने हा प्रश्न अर्धवट अवस्थेत असून या परिसरातील मोकळे मैदान असलेली जागा अर्धी विकासकाच्या तर अर्धी जागा रहिवासी संघटनेच्या ताब्यात आहे. महापालिका कर्मचारी या भागातील कचरा या मैदानावर आणून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे इतरजण कचरा टाकण्यासाठी येतात.

गंधार नगरमधील सोसायटी आणि बंगले
चिंतामणी, धरम, वाल्मीक, साई गणेश, रविराज, केवट-किनारा, साई मयूरेश, महेश, प्रथमेश, आनंद नर्सिग होम, शिवदर्शन, गजानन, द्वारका, सर्वज्ञ, श्री गणेश, विनायक, दत्तकृपा, देवी, दर्शन, पलक, यश, सोमनाथ, जलाराम, कमला जीवन, मंगलमूर्ती, नव भाग्यश्री, वृषभ, गुप्ते बंगला, कांचनगंगा, दयाल, भाग्यश्री, करुणा, गायत्री, मधुस्मृती, कृष्णा नगरी-संकुल, सप्तशृंगी, हरिहर दर्शन, न्यू हिना, अल्पेश, अमित, दीपेश, गोकुळ नगरी, महावीर नगर, तुळशी टॉवर, तुळशी शाम, कैलास पार्क, रामेश्वर, सवरेदय पूजा, ओम सवरेदय, ओंकार बंगला, रिचा अपार्टमेंट, देवी पद्मावती, क्षितिज संकुल, कृष्णा नगरी नं. १.  
श्रीकांत सावंत