लोकसत्ता प्रतिनिधी
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी भविष्यात हा प्रादुर्भाव वाढू नये तसेच करोनाची दुसरी लाट आल्यावर चाचण्यांसाठी केंद्रे अपुरी पडू नयेत या उद्देशातून प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागांत आणखी १५ करोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ं
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ महिन्यांत विविध प्रभागांमध्ये एकूण २२ करोना चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांची मोफत चाचणी केली जात आहे. या चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यानुसार शहराच्या विविध भागांत आणखी १५ नवीन चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी काही केंद्रे सुरू झाली आहेत तर, काही केंद्रे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
गेल्या महिन्यात पालिका हद्दीत दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या ५० ते ६० होती. दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सध्या १५० ते २०० पर्यंत करोना रुग्ण पालिका हद्दीत दररोज आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकला तसेच करोनासदृश रुग्णांची तातडीने करोना चाचणी व्हावी तसेच करोना लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशातून ही चाचणी केंद्रे प्रशासनाने सुरू केली आहेत. पालिका हद्दीत दररोज सुमारे १७०० करोना चाचण्या केल्या जात आहेत.
करोना रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होऊ नयेत, या उद्देशातून प्रशासनाने मोठी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दिवसाला ९०० करोना रुग्ण आढळून आले तरी त्यांच्यावर उपचार करता येतील अशा प्रकारची यंत्रणा पालिकेने उभारली आहे, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
रेल्वे प्रवाशांच्या चाचण्या
कल्याण-डोंबिवली शहरात लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ा आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकाच्या प्रवेशद्वारवर करोना चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांनंतरच या प्रवाशांना शहरात प्रवेश दिला जात आहे. गेल्या २० दिवसांत अशा प्रकारच्या तीन हजार ७०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ११ प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. बाहेरील प्रांतामधून आलेल्या करोनाबाधित तसेच करोनाची लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक तसेच बस आगारातूनच पालिकेच्या करोना उपचार, काळजी केंद्रात दाखल केले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 3:36 am