लाभार्थ्यांच्या तुलनेत जेमतेम २० टक्के नागरिकांना लस; जिल्ह्यात आतापर्यंत २८ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरण करून घेण्याकडे ओढा वाढत असला तरी, कल्याण-डोंबिवली, भिवंडी  आणि उल्हासनगर शहरांत लसीकरणाचा वेग अद्याप मंदच आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांपैकी जिल्ह्यातील २८ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असताना या तिन्ही शहरांच्या क्षेत्रात सरासरी वीस टक्क्य़ांहून कमी लसीकरण झाले आहे. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर ही शहरे मात्र लसीकरणाच्या टक्केवारीत पुढे आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्य़ातही  दिवसाला सरासरी पाच हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर, दररोज सरासरी ३५ ते ४० जणांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्य़ातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ात ४५ वर्षांपुढील नागरिक तसेच आरोग्यसेवक, सफाई कामगार, पोलीस यांचे लसीकरण सुरू आहे. जिल्ह्य़ात सोमवारपर्यंत  ८ लाख ९६ हजार ८६० जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ६ लाख ६३ हजार ७४२ जण हे ४५ वर्षांपुढील नागरिक आहेत. त्यापैकी ६ लाख १६ हजार ८९५ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ४६ हजार ८४७  जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे. उर्वरित २ लाख ३३ हजार ११८ जण हे आरोग्य सेवक, पोलीस, सफाई कामगार आहेत.

सर्वाधिक लसीकरण हे नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात आले आहे. नवी मुंबईची लोकसंख्या ही १५ लाख २ हजार १२० इतकी आहे. या भागात ४ लाख ५० हजार ६३६ नागरिक हे ४५ वर्षांपुढील वयोगटातील आहेत. या ठिकाणी ४२ टक्के लसीकरण झाले आहे. मीरा-भाईंदरमध्येही १० लाख ४७ हजार ३४६ लोकसंख्या आहे. या ठिकाणी ३ लाख १४ हजार २३८ नागरिक हे ४५ वर्षांपुढील आहे. येथे ४० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ठाण्यात २२ लाख लोकसंख्या असून ६ लाख ६० हजार नागरिक ४५ वर्षांपुढील आहेत. येथील ३४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

भिवंडीत ७ लाख ११ हजार लोखसंख्या असून २ लाख १३ हजार ३९७ नागरिक हे ४५ वर्षांपुढील आहेत. या ठिकाणी ११ टक्के लसीकरण झाले आहे. कल्याण डोंबिवलीत १९ लाख १६ हजार ८६३ लोखसंख्या असून येथे ५ लाख ७५ हजार ०५९ नागरिक ४५ वर्षांपुढील आहेत. येथे २० टक्के लसीकरण झाले आहे. ठाणे ग्रामीण क्षेत्रात २० लाख ५८ हजार ७५५ इतकी असून या ठिकाणी ६ लाख १७ हजार ६२७ नागरिक ४५ वर्षांपुढील आहेत. या ठिकाणी २२ टक्के लसीकरण झाले. तर, उल्हासनगरमध्ये ५ लाख ६ हजार नागरिक आहे.