कल्याण, डोंबिवलीच्या उदंचन केंद्रांतून पाणीउपसा करण्यात अडथळे

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात अडकल्यामुळे मोहिली आणि मोहने उदंचन केंद्रांतून पाणी उचलताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात पाणी शोषून घेते. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

कडोंमपा हद्दीतील रहिवाशांना मोहने उदंचन केंद्रातून १२० दशलक्ष लिटर आणि मोहिली येथील केंद्रातून १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मोहने ते मोहिली या पाच किलोमीटरच्या पात्रात जलपर्णी वाढली आहे. तिचे कोवळे वेल तारेच्या साहाय्याने खेचता येतात. पण नदीपात्रातील जलपर्णी वजनदार आणि जून झाली आहे. वेलींना अनेक ठिकाणी बुंध्याचे रूप आले आहे, असे उदंचन केंद्रातील कामगारांनी सांगितले.

मोठय़ा प्रमाणात पाणी शोषून घेणारी ही वनस्पती अशीच पाण्यावर राहिली तर नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होईल. उन्हामुळे बाष्पिभवन होऊन पाणी आटण्याचे प्रमाण वाढणार आहे. सध्या पालिका हद्दीत पाणीकपात लागू आहे. जलपर्णीचा विळखा कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत पाणीकपातीचे प्रमाण वाढण्याची भीती जलअभियंते व्यक्त करत आहेत.

नदीपात्रातून बाहेर काढलेली जलपर्णी थोडा ओलावा मिळाला तरी जीव धरते. हे वेल पुन्हा नदी पात्रात गेले तर ते पुन्हा जोमाने वाढतात. त्यामुळे जलपर्णी नष्ट करणे जिकिरीचे ठरत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले. जलपर्णी नदीपात्रातून काढून टाकण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीला सादर केला होता. नदी पात्रातील सगळीच जलपर्णी काढण्याचे काम पालिकेने केले तर लघु पाटबंधारे विभाग जबाबदारी झटकेल, अशी शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. या कामासाठी पालिकेचा निधी का खर्च करावा, असा प्रश्न करत स्थायी समिती सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. महापालिकेने जलपर्णी काढण्याची मागणी लघु पाटबंधारे विभागाकडे वारंवार केली आहे. एमआयडीसी, पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या भागातून पाणी उचलतात, त्या भागातील जलपर्णी त्यांनीच काढावी, अशी भूमिका लघु पाटबंधारे विभागाने घेतली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा नाइलाज झाला आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

पंपांमध्ये अडथळा

नदी पात्रातून शक्तिशाली पंपाच्या साहाय्याने पाणी उचलले जाते. या पाण्यातून जलपर्णी आत आली आणि वाहिन्यांत अडकली, तर पंप बंद पडतात. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते, असे ठेकेदाराने सांगितले. पाणी उचलण्याच्या ठिकाणी सध्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जलपर्णी मुळासकट काढली नाही तर तिचे पान नव्याने अंकुरते. अख्ख्या नदी पात्रातील जलपर्णी काढणे शक्य नाही, असे पाठक यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

मोहिली येथील उदंचन केंद्राच्या ३० मीटर परिसरातील जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. मे अखेपर्यंत ते सुरू राहणार आहे. जलपर्णीचा विळखा संपूर्ण नदीपात्राला पडला आहे. जलपर्णी काढण्याचे काम लघु पाटबंधारे विभागाचे आहे. पण, हे काम पाणी उचलणाऱ्या स्थानिक संस्थांनी करावे असे त्यांचे म्हणणे आहे. पाण्याची गरज ओळखून उदंचन केंद्राच्या ३० मीटर परिसरातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

-राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, कडोंमपा