कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा आणि रखडलेली कामे हा येथील नागरिकांच्या जिव्हाळय़ाचा आणि राजकारण्यांच्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनला असला, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची झळ बसण्याची शक्यता नाही. नववर्षांच्या स्वागतासाठी डोंबिवलीतून निघणाऱ्या स्वागतयात्रेला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याने कल्याण, डोंबिवलीतील रस्ते चकाचक करण्याचे काम वेगाने सुरू आहे.  
फडके रोड तसेच गणेश पथ येथील रस्त्यांची कामे रखडल्याने यंदा नववर्ष स्वागतयात्रेत अडथळे येण्याची भीती व्यक्त केली जात होती. असे असताना मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताने एरवी टंगळमंगळ करणारे महापालिका अधिकारी गेल्या काही दिवसांपासून ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.  ज्या कामांसाठी महिनाभराचा अवघी लागत होता, ती कामे आता दोन-तीन दिवसांत पूर्ण होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कामे लवकरात लवकर होत आहेत हे चांगलेच आहे, मात्र त्याचा दर्जा खालावू नये, अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत.
पालिका प्रशासनाने २० मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू होती; परंतु मुख्यमंत्री स्वत: स्वागतयात्रेसाठी फडके रस्त्यावर येणार असल्याचे वृत्त धडकताच पालिका प्रशासनाच्या वतीने वेगाने कामे सुरू झाली आहेत. या भागातील महत्त्वाचे रस्ते अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून पदपथावरही चेकर्स (लाद्या) बसविण्यात आल्या आहेत. अप्पा दातार चौकात गणेश पथ व फडके रोड यांच्या मध्यभागी सिमेंटचा पॅच लावण्यात आला आहे. केवळ काम लवकरात लवकर व्हावे म्हणून ही कामे उरकती घेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.  
शहरातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.