कल्याण-डोंबिबली महापालिका क्षेत्रातील कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत पगार न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आधीच कचराप्रश्न गंभीर होत असताना कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, आता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असून कामगार कचरा उचलण्यास पुन्हा सुरूवात करणार आहेत. पण शुक्रवारपर्यंत जर पगार झाले नाहीत तर पुन्हा आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसीने कंत्राट दिले असून ज्या ठेकेदाराला कंत्राट दिले आहे त्याने दोन, तीन महिन्यापासून पगार थकवल्याने कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. कल्याण व डोंबिवलीमध्ये 200 कंत्राटी कामगार कार्यरत असून 120 ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यापैकी डोंबिवलीत सुमारे 200 कामगार कार्यरत असतात, त्या सगळ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं.