शुद्धीकरण यंत्रांमुळे पाण्याचा पुनर्वापर करण्याचा तलाव व्यवस्थापनांचा दावा
पाणीटंचाईच्या झळा बसू लागताच ठाणे महापालिकेने शहरातील तरणतलाव बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरातील चारही तरणतलाव सुरूच राहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने आपल्या प्रमुख तलावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून घेतली असून यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे शक्य होणार आहे. डोंबिवली जिमखान्याची स्वतच्या मालकीची विहीर आहे. त्यामुळे शहरातील हा मोठा तरणतलावही सुरू राहील, असे तेथील व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत तरणतलाव बंद राहिल्याने जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शिबिरांना मुकावे लागते की काय असे चित्र असताना कल्याण डोंबिवलीतील तरणतलावांचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहाणार आहे.
पाणीटंचाईमुळे ठाणे महापालिकेने तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. असे असताना कल्याण डोंबिवलीतील तरणतलाव मात्र सुरूच राहाणार आहेत. डोंबिवलीतील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. तसेच कल्याण येथेही महापालिकेचा तरणतलाव आहे. यासोबतच डोंबिवलीत यश जिमखाना व डोंबिवली जिमखाना यांचे तरणतलाव आहेत. डोंबिवली जिमखान्याचे डॉ. अरविंद प्रधान म्हणाले, ‘जिमखान्याची स्वतची विहीर असल्याने त्यातील पाणी येथील तरणतलावात वापरले जाते. तसेच पाणी शुद्धीकरण केंद्र असल्याने तीन ते चार महिन्यांनी तलावातील पाणी बदलले जाते. या प्रक्रियेमुळे आम्हाला तलाव बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.’
दुसरीकडे यश जिमखाना प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून तरणतलावातील शॉवर बंद केले आहेत. तर पाणी शुद्धीकरण केंद्र असल्याने पाणी तीन ते चार महिन्यांनी बदलले जाते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तरणतलावातही जलशुद्धीकरण केंद्र असल्याने या तलावातील पाणी चार ते पाच महिन्याने बदलले जाते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत तरणतलाव बंद राहाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरात खासगी तरणतलाव मोठय़ा स्वरूपात उभे राहिले आहेत. या तलावांच्या ठिकाणी जल शुद्धीकरण केंद्राची उभारणी झालेली नाही. डोंबिवलीतील तरणतलाव चालविणाऱ्या व्यवस्थापनांनी ही सुविधा वीस वर्षांपूर्वीच बसवून घेतल्याने पाण्याची समस्या फारशी जाणवत नाही, असा दावा येथील व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले.