कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील आव्हाने दिसू लागल्याने शिवसेनेने यंदा उमेदवारांच्या निवडीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या काही नगरसेवकांच्या कामाच्या पद्धतीविषयी रहिवाशांमधून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. काही जुन्या नगरसेवकांना यंदा मतदार घरचा रस्ता दाखवतील, अशास्वरूपाची माहिती नेत्यांना मिळाली आहे. त्यामुळे नवे चेहरे िरगणात उतरवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नगरसेवकांना आयात करण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे.शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागील २० वर्षांत पक्षात काम करूनही उमेदवारी मिळत नसल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला नाराजांचा मोठा फटका बसला होता. कल्याण-डोंबिवली महापालिकेत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या काही नगरसेवकांचे प्रभाग नवीन रचनेत तुटले आहेत. या नगरसेवकांची निवडून येण्याची ताकद, या प्रभागातील इच्छुक उमेदवार, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून आयात केलेले नगरसेवक, कार्यकर्ते यांची संख्या आणि ताळमेळ पाहून शिवसेनेकडून इच्छुकांना उमेदवारी देण्यात येणार आहे.मागील २० वर्षांपासून प्रभागात ठाण मांडून बसलेल्या बुजुर्ग नगरसेवकांना यावेळी थांबण्याचे आदेश शिवसेना नेत्यांकडून देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्याशी लढत देताना शिवसेनेचे शहरप्रमुख विजय ऊर्फ बंडय़ा साळवी पराभूत झाले होते. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असताना साळवी यांचा पराभव शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. शिवसेनेच्या काही पदाधिकारी, नगरसेवकांनी ऐन निवडणुकीदरम्यान साळवी यांची साथ सोडली. त्यामुळे साळवी यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अशा बंडोबांना घरचा रस्ता दाखविता येईल का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

क्षमता बघून निर्णय
सरसकट जुन्या नगरसेवकांना बदलण्यात येणार नाही. पण प्रभागात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार कोण हे पहिले पाहिले जाईल. त्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल. अन्य पक्षातून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची प्रभाग रचना पाहून, त्या उमेदवाराची निवडून येण्याची ताकद ओळखून त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल.
– गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख