कल्याण : मागील तीन दिवसात ३१ जणांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कल्याण, डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यामध्ये व्यापारी, पानटपरी चालक, मटण विक्रेते, जमावबंदीचा आदेश मोडणाऱ्यांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात गेल्या आठवडय़ापासून जनजागृती सुरू केली आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना महापालिका आणि पोलिसांकडून केल्या जात आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडा, समूहाने एकत्र जमू नका, विविध प्रकारचे सण, समारंभ रद्द करण्यात आले असून अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नका. अशा प्रकारचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्याला अनेक जण प्रतिसाद देत नसून अनेक उत्साही तरुण मुले रस्त्यावर क्रिकेट खेळणे, काही रिक्षाचालक बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. तसेच काहीजण दुकाने सुरू ठेवत आहेत. अशा सर्वावर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात नऊ व्यापारी, कोळसेवाडी पोलीस ठाणे एक, डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे दोन, टिळकनगर पोलीस ठाणे नऊ, याशिवाय रात्रीच्या वेळेत जमावबंदी असताना घोळक्याने फिरणे, दारूचे दुकान चालू ठेवणे, वाहने चालविणे, रिक्षेतून प्रवासी वाहतूक करणे अशा १० जणांवर विविध पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.