कल्याण-डोंबिवलीकर आघाडीवर; पुणेकरांचा दुसरा क्रमांक

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निराकरण व्हावे, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर कल्याण डोंबिवलीकरांनी अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला असून गेल्या दोन वर्षांत राज्यातील २७ महापालिका क्षेत्रांपैकी सर्वाधिक ऑनलाइन तक्रारींमध्ये कल्याण, डोंबिवलीकर अव्वल ठरले असून त्यापाठोपाठ मीरा-भाईंदर आणि ठाणेकरांनीही तक्रारी केल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून रहिवाशांनी पालिकेचा कारभार, अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी उडवाउडवीची उत्तरे, प्रलंबित कामे यासंबंधी तब्बल तीन हजार ११७ तक्रारी शासनाच्या तक्रारस्थळावर आहेत. मिरा-भाईंदर पालिका हद्दीतून ९१८, ठाणे पालिका हद्दीतून  ८२६ तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीनंतर सर्वाधिक तक्रारी पुणे महापालिका हद्दीतून (१ हजार ८०९) केल्या आहेत. स्थानिक महापालिकांमध्ये तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नसल्यास जागरूक नागरिक सरकारी तक्रार संकेतस्थळांचा आसरा घेतात, असा अनुभव आहे. गेल्या दोन वर्षांत ‘आपले सरकार’ स्थळावर राज्यातील २७ महापालिकांमधून १३ हजार २६० तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारी तक्रार स्थळावर दाखल झाल्या की त्यानंतर त्याचे स्वरूप पाहून संबंधित अधिकाऱ्यांकडे निपटारा करण्यासाठी पाठविल्या जातात. अशा पद्धतीने गेल्या दोन वर्षांत ६ हजार ९२८ तक्रारी सोडविल्या आहेत. उर्वरित ३ हजार ४९ तक्रारी शासनस्तरावर कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहेत.

तक्रार निवारणाबाबतची आकडेवारी

‘आपले सरकार’ स्थळावर दाखल झालेल्या पोलीस, शासन, पालिका, जिल्हा परिषदा स्तरांवरील तक्रारींची माहिती मागविली होती. कल्याण-डोंबिवली पालिकेशी संबंधित एकूण तक्रारींपैकी ६१८ तक्रारी सोडविल्या आहेत. १ हजार १९२ तक्रारी अद्याप शासन स्तरावर प्रलंबित आहेत. ठाणे पालिका हद्दीतील ४४१ तक्रारी मार्गी लावल्या आहेत. १६१ तक्रारी प्रलंबित आहेत. भिवंडी पालिकेबाबत ३३४ तक्रारी आहेत. यामधील २२५ तक्रारी सोडविण्यात आल्या असून उल्हासनगर पालिकेत दाखल ५०५ तक्रारींपैकी २४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेबाबत ४४१ तक्रारी दाखल असून ३१६ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पुणेकरांचा सरकारी संकेतस्थळावर तक्रारी करण्यात दुसरा क्रमांक आहे. या पालिकेच्या १८०८ तक्रारी दाखल आहेत. मुंबई शहरातून २२६, उपनगरातून ४१७ तक्रारी ‘आपले सरकार’ स्थळावर दाखल आहेत.

रहिवाशांना तातडीने न्याय मिळावा हा ‘आपले सरकार’ तक्रारस्थळ सुरू करण्यामागील शासनाचा उद्देश होता. गेल्या दोन वर्षभरात हजारो तक्रारी या स्थळावर नागरिकांनी केल्या आहेत. पण थातुरमातुर उत्तरे शासनाकडे पाठविण्याव्यतिरिक्त या तक्रारींची दखल कडोंमपाकडून घेण्यात आलेली नाही. अनेक तक्रारींची दखलच घेतली गेलेली नाही. त्यामुळे आपले सरकार तक्रारस्थळ सुरू करण्यामागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश दूरगामी असला तरी अधिकारी त्या योजनेला हारताळ फासत आहेत.

-कौस्तुभ गोखले, याचिकाकर्ते