दोन महिन्यांत होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १२२ प्रभाग निश्चित केले असून या प्रभागांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. बदललेली प्रभाग रचना आणि आरक्षण यांमुळे महापालिकेतील राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे असून गेल्या दहा वर्षांपासून पालिकेत असलेल्या १५ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना अन्यत्र शोधाशोध करावी लागणार आहे. नव्या प्रभाग रचनेचा सर्वाधिक फटका शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांना बसल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेली दरी, शहरातील विकासकामांचा बोजवारा आणि नव्याने पालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. आधीच्या पालिका क्षेत्राच्या लोकसंख्येत झालेली दोन लाखांची वाढ आणि सोबत २७ गावांतील सुमारे तीन लाखांची लोकसंख्या यांमुळे महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ झाली आहे. प्रभागांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी आचार्य अत्रे सभागृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पालिका आयुक्त ई. रवींद्रन, साहाय्यक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
या सोडती पाहण्यासाठी सभागृह आणि बाहेरही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. एखाद्या नगरसेवकाचा प्रभाग महिला आरक्षित किंवा अन्य प्रवर्गासाठी आरक्षित झाला की आचार्य अत्रे सभागृहात जल्लोष केला जात होता.
शिवसेनेचे सुनील वायले, रवी पाटील, विद्या भोईर, अरिवद्र पोटे, दीपेश म्हात्रे, रामदास पाटील, जनार्दन म्हात्रे, उल्हास भोईर, अमित सुलाखे, राजन मराठे, दुर्योधन पाटील तसेच मनसेचे मंदार हळबे, शरद गंभीरराव, सुदेश चुम्डनाईक, मनोज राजे, मनोज घरत, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि विद्यमान विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, हृदयनाथ भोईर, राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे, निलेश शिंदे, संजय पाटील, भाजपचे श्रीकर चौधरी यांचे प्रभाग आरक्षित अथवा वगळले गेले आहेत. त्यांना नव्याने प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. संबंधित बातमी..६
संघर्ष समितीचा बहिष्कारच
२७ गावांमधील उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली पट्टय़ातील ग्रामीण भागात १८ नवीन प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या गावांमधून दहा नगरसेविका पालिकेत येणार आहेत. यावेळी १५ वर्षांनंतर प्रथमच २७ गावांमधील अनेक नागरिक या प्रभाग आरक्षण सोडतीचा निकाल पाहण्यासाठी आले होते. मात्र, संघर्ष समितीचा एकही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता.
मागील पाच वर्षांत पालिकेचे १०७ प्रभाग होते. यामध्ये पाच स्वीकृत नगरसेवक होते. यापूर्वी दहा हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता.
यावेळी एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ इतकी झाली आहे. वाढीव लोकसंख्येप्रमाणे १२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग करण्यात आला आहे.
त्यानुसार पालिका क्षेत्रात १२२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
यापैकी ६१ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
शहरी व ग्रामीण पट्टय़ात नव्याने ४७ प्रभाग अस्तित्वात आले आहेत.
ग्रामीण भागात १८ नवीन प्रभागांची रचना करण्यात आली आहे.