कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात प्रशस्त रस्त्यांवर बुलेटचालक कर्णकर्कश भोंगे वाजवत वाहन चालवत असल्याच्या वाढत्या तक्रारी वाहतूक विभागाकडे आल्या होत्या. रात्री अकरा वाजल्यानंतर नागरी वस्तीमधून बुलेट नेताना अनेक चालक मोठा आवाज करत स्थानिक रहिवाशांसाठी त्रासाचे कारण ठरू लागले होते. मागील दोन दिवस डोंबिवली, कल्याणमधील वाहतूक विभागाने शहराच्या विविध भागांत १५० हून अधिक बुलेट वाहने तपासून या वाहनांमधील कर्णकर्कश भोंगे काढून चालकांवर कारवाई केली.

गेल्या दीड वर्षाच्या काळात घराघरांत करोनाचे रुग्ण उपचार घेऊन घरी आले आहेत. अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. काहींना हृदयाचे त्रास आहेत. मोठा आवाज अनेकांना सहन होत नाही. लहान बालकांना कर्णकर्कश आवाज सहन होत नाही. शहराच्या विविध भागांत रुग्णालये आहेत. तेथे करोना रुग्णांसह अनेक प्रकारची व्याधी असलेले रुग्ण उपचार घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक, वृद्धांना कर्णकर्कश आवाज सहन होत नाही. डोंबिवली, कल्याणमध्ये अनेकांकडे बुलेट वाहन आहे. या वाहनांच्या मूळ भोंग्यांमध्ये बदल करून उल्हासनगर येथून ८०० रुपयांपासून ते तीन हजार रुपये किमतीत मिळणारे कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे बुलेट वाहनांना बसविण्यात आले आहेत. हे वाहनचालक अनेक वेळा कर्णकर्कश आवाज करून बुलेट चालवीत असतात. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता, डोंबिवली एमआयडीसीतील रस्ते, सावरकर रस्ता, फडके रस्ता, मानपाडा रस्ता, डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते, म. फुले रस्ता, सुभाष रस्ता, मुरबाडमध्ये मुरबाड रस्ता, दुर्गाडी चौक, खडकपाडा, कोळसेवाडी भागांत या बुलेटचालकांनी कर्णकर्कश आवाज करीत वाहने चालविण्याचा धुमाकूळ घातला होता. याविषयी अनेक रहिवाशांनी वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कल्याण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांना कल्याण, डोंबिवलीतील सर्व बुलेटची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये बुलेटचालकांना अडवून वाहनांना बसविलेल्या कर्णकर्कश भोंग्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १५० हून अधिक बुलेटचालकांनी कर्णकर्कश भोंगे बुलटेला बसवून घेतले असल्याचे आढळले. या तपासणी नाक्यावर पोलिसांनी बुलेटचे कर्णकर्कश भोंगे तंत्रज्ञाच्या मदतीने काढून घेतले. नियमभंग केला म्हणून चालकांवर कारवाई केली. काढून टाकलेल्या भोंग्यांचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते भोंगे एका रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने यांनी दिली.

डोंबिवलीत ५० बुलेटवर कारवाई

डोंबिवली परिसरात सुमारे ५० हून अधिक बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय चारचाकी वाहनांना काळ्या फिल्म लावून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, असे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.