04 August 2020

News Flash

कचरा वर्गीकरणाच्या निर्धारास नागरिकांचा पाठिंबा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या खर्चात दिवसाला तीन लाखांची बचत

कल्याण-डोंबिवली पालिकेने गेल्या महिनाभरापासून रहिवाशांकडून ओला-सुका कचरा जमा करण्यास सुरुवात केली आहे.

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेने गेल्या महिनाभरापासून रहिवाशांकडून ओला-सुका कचरा जमा करण्यास सुरुवात केली आहे. या नियोजनामुळे महापालिकेच्या घनकचरा निर्मूलन खर्चात दररोज तीन लाख रुपयांची बचत होत आहे, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

शहर कचरामुक्त करण्याचा निर्धार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी केला आहे. कचरा ओला सुका करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नियोजन केले जात आहे. मागील महिन्यापासून प्रत्येक वसाहतीला ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करुन देण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. असे वर्गीकरण ज्या वसाहतीत केले जाणार नाही तेथील कचरा उचलायचा नाही तसेच दंड आकारणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक निर्णयामुळे अनेक सोसायटय़ांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण करून पालिकेच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे. सध्या पालिकेकडे दररोज १५० टन ओला कचरा जमा होत आहे. १० प्रभागांमधील काही प्रभागांमध्ये २० ते २५ टन कचरा जमा होत आहे. ब प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते प्रभागातील घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा वेगळा देण्याने होणारे लाभ, शहर कचरामुक्ती कसे वाटचाल करील याची माहिती देत आहेत. असे प्रबोधन इतर प्रभागांमध्येही सुरू आहे. या जागृतीमुळे ‘ब’ प्रभागात काही दिवसांपासून दररोज २० ते २५ टन कचरा जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. अनेक सोसायटय़ांनी पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

कचरा वाहतूक खर्चात बचत

कचरागाडीत असलेल्या कचऱ्याच्या वजनावरून अनेक वर्षे ठेकेदाराला घनकचरा विभागातून देयक दिले जात होते. आता ओला-सुका कचरा वेगळा होऊन तो कचरावाहू गाडीतून आधारवाडी क्षेपणभूमीवर आणला जातो. यापूर्वी कचरागाडीचे काटय़ावर वजन वाढण्यासाठी ठेकेदार कचऱ्याखाली सिमेंट, लाद्या, विटांचा चुरा टाकत होते. अशी बनावट देयके ठेकेदार अधिकारी, काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने वर्षांनुवर्षे घेत होते. या नव्या रचनेमुळे बहुतांश ठेकेदार अस्वस्थ झाले आहेत.

३०० टन कचरावाहू गाडीचे वजन सध्या १५० टन होत असून पालिकेची दररोजची सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची बचत होत आहे. रहिवासी, घनकचरा अधिकारी, कचरावाहू ठेकेदार, कामगार यांनी चांगली साथ दिली तर पालिकेला दरमहा सुमारे ५० लाख ते दोन कोटीपर्यंतचा लाभ कचऱ्याच्या माध्यमातून होऊ शकतो, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ओला-सुका कचरा मोहिमेला रहिवाशी चांगला प्रतिसाद देत आहेत. मागील काही दिवसांत सुमारे १५० टन ओला कचरा जमा होत आहे. सुका कचरा उचलण्यासाठी घंटागाडय़ांचे नियोजन केले जात आहे. ओला-सुका कचरा मोहिमेसाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सोसायटी पदाधिकारी, रहिवाशांना पालिकेकडून मार्गदर्शन केले जात आहे आणि त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत आहे.

– रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 7:54 am

Web Title: kalyan dombivli citizens supporting garbage sorting dd70
Next Stories
1 ठाण्यात ८१ रुग्णवाहिका सेवेत
2 ग्रामीण भागात करोना रुग्णांची फरफट
3 आठवडाभरात २६१ रुग्ण; वसई-विरार शहरांतील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ
Just Now!
X