कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी शहराबाहेरील खाडीकिनाऱ्यालगत उभारण्यात येणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आयुक्त ई.रवींद्रन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे. शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करणे, बेकायदा बांधकामे पाडणे असे काही महत्त्वाचे विषय मार्गी लावल्याशिवाय हे काम सुरू होणे नाही. हा रस्ता पूर्ण झाला तर कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास साहाय्य होणार आहे. वळण रस्त्याच्या प्रस्तावित मार्गात भूमाफियांनी बेसुमार बेकायदा चाळी, गाळे उभारले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा वळण रस्ता मार्गी लावताना रवींद्रन यांना भूमाफिया आणि त्यांना राजाश्रय देऊ पहाणाऱ्या नेत्यांचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने आठ वर्षांपासून लालफितीत अडकलेली बाह्यवळण (रिंगरूट) रस्त्याची नस्ती बाहेर काढली आहे. या काळात आठ ते नऊ आयुक्त महापालिकेला लाभले. या काळात प्रशासनाला बाह्यवळण रस्ता काय आहे आणि हा रस्ता नक्की कोठून जातो, यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर काय फरक पडेल याचा विचार करावासा वाटला नाही. जोपर्यंत हितसंबंध साधले जात नाहीत, तोवर विकासकामांची नस्ती आयुक्तांच्या टेबलावर येणार नाही याची काळजी घेणारे अभियंते कल्याण-डोंबिवली महापालिकेत पायलीभर सापडतील.
महापालिकेतील अभियंत्यांची फळी तगडी असेल तर त्याचे दृश्य शहर विकासाच्या माध्यमातून सामान्यांना दिसते. या ठिकाणी मात्र तसे चित्र नाही. महापालिकेत कोणतेही बडे काम करायचे असेल तर सल्लागार नेमून आपले काम सोपे करायची रीतच या ठिकाणी बनून गेली आहे. सावित्रीबाई फुले नाटय़गृहाचा अपवाद सोडला तर सल्लागारांवर कोटय़वधींचा दौलतजादा करण्यात अभियांत्रिकी विभागाचा बराचसा वेळ खर्ची पडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे चित्र बदलू लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेस ई.रवींद्रन यांच्या रूपाने काम करणारा अधिकारी मिळाला आहे. यापूर्वी एखाद्या विषयाची नस्ती तयार करा. त्यावर प्रभागापासून अभिप्राय मागवा. असा वेळकाढू कारभार चालत असे. आवश्यक तेवढीच कागदोपत्री प्रक्रिया करून तडकाफडकी निर्णय यावर रवींद्रन यांचा भर दिसतो आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ लालफितीत अडकलेल्या कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्य़वळण (रिंगरुट) रस्त्याची नस्ती आयुक्तांनी बाहेर काढली आहे.
हा बाह्यवळण रस्ता यापूर्वीच तयार झाला असता तर आज कल्याण-डोंबिवली शहरे वाहनांच्या ओझ्याने वाकली नसती. मात्र, दूरदृष्टी नसलेले लोकप्रतिनिधी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांना याविषयी काहीच पडले नव्हते. कल्याण-डोंबिवलीतील वाहनांची वाढती संख्या, सततची वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हे येत्या काळात शहरवासीयांसाठी चिंतेचा विषय होणार आहे. यावर प्रभावी उपाय शोधणे आवश्यक आहे. बाह्य़वळण रस्ता डोंबिवली पूर्व भागातील आयरे, पश्चिमेतील कोपर, ठाकुर्ली, गावदेवी, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याणमधील वाडेघर, उंबर्डे, कोळीवली, गंधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी व मांडा टिटवाळा असा प्रस्तावित आहे. २६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता ३० मीटर, काही ठिकाणी ४५ मीटर रुंदीचा आहे. हा रस्ता खाडीकिनाऱ्याहून प्रस्तावित आहे. टिटवाळ्याच्या एखाद्या वाहन चालकाला डोंबिवलीत यायचे असेल तर कल्याण-डोंबिवलीत शहरात न येता बाह्य़वळण रस्त्यावरून थेट प्रवास करीत आयरे गावातून जाण्याचा पर्याय या रस्त्यामुळे उपलब्ध होऊ शकतो. शहरातील निम्मी वाहतूक बाह्य़वळण रस्त्याने झाली तर शहराअंतर्गत वाहतुकीवर जो ताण येत आहे तो कित्येक पटींनी कमी होणार आहे. आठ वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला असता तर सुमारे महापालिकेचे किमान २०० कोटी रुपये वाचले असते. वाढत्या किंमतीमुळे या रस्त्याचे दरपत्रक एव्हाना ३८० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या साहाय्याने हा रस्ता कल्याण-डोंबिवली महापालिका तयार करणार आहे.
या रस्ते प्रकल्पात आड येणाऱ्या बहुतांश जमिनी शेतक ऱ्यांच्या आहेत. काही जमिनींवर महापालिकेची चौपाटी, उद्यान, बगीचे अशा सार्वजनिक सुविधांचे आरक्षण आहे. वळण रस्त्यासाठी शेतक ऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना योग्य मोबदला दिला तर या विषयावरून वाद निर्माण होणार नाहीत. विकास हस्तांतरण हक्कासारखे पर्याय महापालिकेकडे उपलब्ध आहेत. गावदेवी भागातील मौजे शिवाजीनगर पट्टय़ातील शेतक ऱ्यांनी गेल्या वर्षांपासून या रस्त्यासाठी जमीन देण्याची तयार दर्शविली आहे. महापालिकेने शेतकऱ्यांशी संवाद साधला तर अनेक भागांत हा प्रश्न निकाली निघू शकतो. शिवाजीनगर पट्टय़ातील शेतकऱ्यांनी जमिनीचे ७/१२ उतारे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नावे करून दिले. नगररचना विभागातील ‘चराऊ’ कुरणात ठाण मांडून बसलेल्या नगररचनाकारांनी शेतक ऱ्यांची अडवणूक सुरू केली. ‘पालिकेला तुम्ही जमिनी दिल्या असल्या तरी जमीन समतल (भरणी) करून द्या, त्या ठिकाणी खडीकरणाचा कच्चा रस्ता (डब्ल्यू. बी. एम.) करून द्या, असे प्रस्ताव काही अधिकाऱ्यांनी पुढे रेटले. त्यामुळे सहकार्याची भाषा करणारे शेतकरी नाराज झाले. जे शेतकरी नगररचना विभागातील संबंधितांच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत त्यांच्या नस्ती लालफितीत गुंडाळून ठेवण्यात आल्या. वर्षभर शेतकरी पालिकेत आमच्या नस्ती बाहेर काढून टीडीआर द्या, म्हणून तगादा लावीत होते. पण या विभागातील काही अधिकारी शेतकऱ्यांना दाद देत नव्हते. या सवार्र्चा फटका बाह्य़वळण रस्ते प्रकल्पाला बसला.
प्रस्तावित बाह्य़वळण मार्गातील गेलेल्या जमिनीवरील अनेक जमीन मालकांनी महापालिकेला जमिनी हस्तांतरित केल्या. त्या बदल्यात पालिकेडून ‘टीडीआर’ घेऊन तो आपल्या बांधकामात वापरला आहे. काहींनी विकला आहे. या मंडळींनी जमिनी पालिकेच्या नावावर करण्यास दिरंगाई केली. आठ वर्षांपासून पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या जमिनी पडिक राहिल्याने या जमिनीवर मालकांनी पुन्हा बेमालूमपणे बेकायदा चाळी, गाळ्यांची बेकायदा बांधकामे केली आहेत. या सगळ्या प्रकारात पडद्यामागून काही आजी, माजी नगरसेवकांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. भूमाफियांना साथीला घेऊन बेकायदा चाळी उभारणारे राजकीय नेते पुन्हा शेतक ऱ्यांचा कैवार घेऊन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाह्य़वळण रस्त्यासाठी शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतो आहे याविषयी ओरड करताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. वळण रस्त्याच्या जागेवर उभ्या राहिलेल्या चाळींना राजकीय आशीर्वाद आहे हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे बेकायदा चाळींमधील रहिवासी बेघर होतील, त्यांचे आधी पुनर्वसन करा किंवा त्यांना पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत स्थलांतरित करा, असा धोशा लावून वळण रस्ते कामात जेवढा आणता येईल तेवढा अडथळा आणतील, अशी भीती आहे.
बाह्यवळण रस्त्याच्या २६ किलोमीटरपैकी आयरे, कोपर पूर्व, मोठागाव, शिवाजीनगर, कांचनगाव, कचोऱ्यापासून ते टिटवाळापर्यंतच्या १५ ते १६ किलोमीटरच्या वळण रस्त्याच्या मार्गात बेकायदा चाळी, गाळे यांचीच अतिक्रमणे आहेत. गरीबाचापाडा भागातील ४० एकरच्या चौपाटीच्या भूखंडावर ५०० ते १००० हजार चाळी उभारण्यात आल्या आहेत. हे इमले तोडताना आयुक्तांसमोर मोठे आव्हान असणार आहे. या मार्गात कोणी लोकप्रतिनिधी, जमीन मालक, शेतक ऱ्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर, कल्याण- डोंबिवलीतील सामान्यांनी एकजुटीने आयुक्तांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे. रवींद्रन मात्र ही कोंडी फोडण्यात यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा आहे.