कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांना इमारतींची चिंता
प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली. या स्फोटामुळे अनेक घरांची पडझड झाली. यापैकी काही घरांचे पंचनामेही झाले. शक्तिशाली स्फोटामुळे दुकाने, कारखाने तसेच इमारती, चाळीवजा घरे यांच्या भिंतीही कमकुवत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या बांधकामांचे संरचनात्मक परीक्षण केल्यावरच नेमक्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या इमारतींचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करा, अशा स्वरूपाची मागणी जोर धरत असली तरी यासंबंधी ठोस असे आदेश प्रशासकीय प्रमुखांकडून दिले जात नसल्याने यासंबंधीची कार्यवाही कशी करायची यासंबंधीचा संभ्रम वाढू लागला आहे.
प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाने निवासी विभागातील अनेक इमारतींची थोडय़ा फार प्रमाणात पडझड झाली आहे. काही इमारतींच्या भिंतींना तडे गेले असल्याचेही पंचनाम्यामध्ये समोर आले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने यंदाच्या पावसाळ्यात इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या परिसरातील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्फोट झाला त्या ठिकाणी भलामोठा खड्डा पडला आहे.
हे चित्र आसपासच्या इमारतींच्या बांधकामांसाठी निश्चितच चांगले नाही, असे संरचनात्मक अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आसपासच्या इमारतींचे तातडीने संरचात्मक परीक्षण करून घ्यावे, असा मतप्रवाह असला तरी यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नसल्याने असे परीक्षण नेमके करायचे कुणी आणि त्यासाठी येणारा आर्थिक भार उचलायचा कसा, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून निवासी विभागातील स्फोट झालेल्या घटनेपासून दोन ते तीन किमी परिसरांतील सर्व वास्तूंचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. यासंबंधी लेखी आदेश नसल्याने हे परीक्षण करण्याचा खर्च कोणी उचलायचा याची चिंता अधिकाऱ्यांना आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात याची तरतूद नाही. असे असताना अशा पराक्षणासाठी लागणारा खर्च उचलणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे हे परीक्षण करावे की नाही हाच प्रश्न पालिका अधिकाऱ्यांपुढे आहे.

या विषयी पालिकेने नेमलेल्या संरचनात्मक परीक्षण अभियंत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संरचनात्मक परीक्षण करायचे म्हणजे २ ते ३ रुपये फुट या दराप्रमाणे एका घराचा साधारण खर्च १० ते १५ हजारांच्या घरात जातो. पालिकेने तसे आदेश दिल्यास असे संरचनात्मक परीक्षण करण्यास आम्ही तयार आहोत.
मात्र, खर्च नेमका कोण उचलणार असा, सवाल या अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. महापालिकेने यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी मुंब्रा येथे इमारत कोसळल्यानंतर त्या परिसरातील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले होते.
त्याचे मानधनही अद्याप काही संरचनात्मक अभियंत्यांना मिळालेले नाही. त्यामुळे डोंबिवलीच्या प्रकरणात कुणीही पुढाकार घेण्यास तयार नसल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे.