कल्याण-डोंबिवली शहर सौंदर्यीकरणाच्या प्रयत्नांना नागरिकांचा खो
कल्याण-डोंबिवली शहरात रहदारीच्या रस्त्यांवरील कचरा कुंडय़ा हटविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रमुख रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना दरुगधीचा सामना करावा लागू नये तसेच शहर सौंदर्यीकरणातही बाधा पोहचू नये, असा उद्देश त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, रहदारीच्या रस्त्यांवरील कचराकुंडय़ा हटविण्यात आल्या असल्या तरी मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याची नागरिकांची सवय सुटता सुटत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे कमालीची पिछाडीवर पडली आहेत. महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर ई.रवींद्रन यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. तसेच शहर सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत आहे. असे असले तरी शहर स्वच्छतेच्या आघाडीवर पुर्वानुभव फारसा चांगला नसल्याने त्याचा फटका सर्वेक्षणात या शहरांना बसला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी दर्शनी भागात असलेल्या काही कचरा कुंडय़ा महापालिकेने हटविल्या आहेत. तसेच या ठिकाणी कचरा टाकू नये, अशा सूचनाही केल्या आहेत. तरीही नागरिक या ठिकाणी कचरा टाकत आहेत. कचरा कुंडी हटविण्याच्या एक महिना अगोदर त्या कुंडीच्या ठिकाणी नोटीस लावली जात आहे. तरीही नागरिक दखल घेत नसल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे.
सोसायटय़ांमधून गोळा होणारा कचरा केवळ या ठिकाणी टाकला जात नाही तर काही नागरिक कामाला जाता जाता पिशवीत आणलेला कचरा कचरा कुंडी हटविण्यात आलेल्या ठिकाणी टाकत असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा दिवसभर भटके कुत्रे, मांजर, उंदीर आदी प्राणी विस्कटतात आणि तो इतरत्र पसरला जात आहे. नागरिकांच्या या अनास्थेविषयी काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.