१ रुपया दराने जप्त मालमत्ता कडोंमपाच्या ताब्यात; महसूल जमविण्याचा प्रशासनाचा अंदाज चुकला
कल्याण-डोंबिवली महापालिकेने करचुकव्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव शुक्रवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित केला होता. या लिलावासाठी एकही धनदांडग्या ठेकेदाराने, जमीन मालकांनी बोलीसाठी हजेरी लावली नाही. या लिलावातून सुमारे २० कोटी रुपये महसूल मिळेल, असा प्रशासनाचा अंदाज होता. पण तो फोल ठरला. अखेर लिलाव घेण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने महापालिका प्रशासनाने १ रुपये नाममात्र दराने या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या. जप्त केलेल्या या सर्व मालमत्ता थकीत कर रद्द करून महापालिकेने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तांवर यापुढे पालिकेचा ताबा असणार आहे.
डोंबिवलीतील पाच विकासकांनी महापालिकेची एकूण १ कोटी ५८ लाख १३ हजार रुपयांची कराची रक्कम थकवली आहे. या विकासकांमध्ये मनोहर व विजय चौधरी (कांचनगाव), मोहम्मद युसूफ (कांचनगाव), अजय जैन (नवागाव), अजय ठक्कर (जुनी डोंबिवली), काशिनाथ मोरे (देवीचापाडा) यांचा समावेश आहे. वेळोवेळी नोटिसा पाठवूनही या विकासक, जमीनमालकांनी कराचा भरणा केला नाही. महापालिकेने या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर करण्याचे ठरविले. लिलावाच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपये जमा होतील आणि कराची थकबाकी वसूल होईल, असा कयास बांधण्यात आला होता. महापालिकेला या वेळी मालमत्ता करातून ३४५ कोटी वसूल करायचे आहेत. दररोज सुमारे ४ कोटी रुपये वसूल केले तर लक्ष्यांक पूर्ण होणार आहे.त्यामुळे हा लिलाव महत्त्वाचा मानला जात होता.

कारवाईच्या फेऱ्यातील विकासक
नेपच्यून विकासक ६ कोटी कर थकबाकी, मुथा विकासक १ कोटी १०, चाम्र्स सिटी २ कोटी २५, पुनामिया १ कोटी, निर्मल लाइफस्टाइल ८ कोटी, मंगेश गायकर २ कोटी १९ लाख, महेंद्र हरिया १ कोटी ४८ लाख. या धनदांडग्या विकासकांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामधील काही विकासकांनी थकीत रकमेतील काही कर भरणा करण्याचा प्रयत्न केला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

धनदांडग्यांना दुसरा धक्का..
येत्या मंगळवारी आणखी सात मालमत्तांचा लिलाव प्रशासनाने जाहीर केला आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिर येथे दुपारी तीन वाजता हा लिलाव होणार आहे. या विकासकांनी ६ कोटी ७९ लाखाचा महसूल थकविला आहे. या विकासकांच्या मालमत्ता लिलावातून ६५ कोटी २१ लाखांचा महसूल मिळेल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. या दुसऱ्या लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली तर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड होणार आहे. या सगळ्यांचा परिणाम विकास कामांवर होणार आहे. मोतीराम ढोणे व सॅब डेव्हलपर्स, बारावे, २ कोटी ३४ लाख, सुरेध वाधवा व प्रल्हाद भोईर, चिकणघर, १ कोटी ५३ लाख, आर. के. विधी प्रसारक मंडळ, मुकुंद व बळीराम पाटील, चिकणघर, २३ लाख, रघुनाथ माळी, वाडेघर, ४५ लाख २६ हजार, सूर्यकांत संगोई, कल्याण, २३ लाख, अरविंद शेठ, कल्याण, १ कोटी, प्रफुल्ल मोटा व स्वामी नारायण संस्कृती सेवा ट्रस्ट, कल्याण, ९५ लाख. या विकासक, जमीन मालकांच्या जप्त मालमत्तांचा १५ मार्च रोजी लिलाव होणार आहे.