कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत २२०० सफाई कामगार काम करतात. या कायम, ठोक पगारी कामगारांच्या वेतनावर महापालिका दरमहा लाखो रुपये खर्च करते. अशा परिस्थितीत एकूण सफाई कामगारांपैकी फक्त एक हजार ते १२०० कामगार प्रामाणिकपणे कचरा उचलण्याचे नियमित कामे करीत आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. उर्वरित सहाशे ते सातशे कामगार कामावर न येता हजेरी शेडवर आरोग्य निरीक्षकांच्या ‘आशीर्वादाने’ हजेरी लावून दुसऱ्या कामाला निघून जातात. सुमारे ३०० ते ४०० कामगार आजार, व्यसनांमुळे काही महिन्यांपासून कामावर येत नसल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.
आरोग्य विभागातील या बजबजपुरीमुळे महापालिकेने कचरा उचलण्याची काही कामे भाडेतत्त्वावर देऊन गेल्या सात महिन्यांत या ठेकेदारीवर ९४ लाख २० हजार रुपये खर्च केले आहेत. महापालिकेच्या डोंबिवलीतील ‘ह’ आणि कल्याण पूर्वमधील ‘ड’ प्रभागातील कचरा उचलण्यासाठी ४ जेसीबी आणि २० डंपर भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पुढाकाराने मंजूर करून घेतला आहे. या प्रस्तावांमध्ये मोठा ‘घोळ’ असल्याची टीका नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केली आहे.
घन कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, कचऱ्याचे वहन आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार यांमधील बेबनाव, आरोग्य विभागप्रमुखांचे या कामगारांवर नियंत्रण नसल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे. उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी घनकचऱ्याच्या विषयावरून पालिकेला फटकारल्यानंतर आयुक्तांसह अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
सफाई कामगारांची कुंडली
घन कचऱ्याच्या विषयावर गेल्या नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निलेश शिंदे यांनी सफाई कामगारांची ‘कुंडली’ सभागृहात मांडली होती. आरोग्य विभागात सुरू असलेला अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आणला होता. पालिका हद्दीतील १०७ नगरसेवकांचे प्रभाग ७ प्रभाग क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. ‘अ’ प्रभागात १७३ सफाई कामगार कार्यरत आहेत. प्रत्यक्षात ९० कामगार कामावर येतात. हीच परिस्थिती इतरही प्रभागात आहे. या कामगारांपैकी फक्त १ हजार ७५८ कामगार कामावर आहेत. सुमारे चारशे कामगार विविध व्याधी, व्यसनांनी जर्जर असल्याने ते पालिकेकडे फिरकत नाहीत, असे वास्तव नगरसेवक निलेश शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडले होते.
याच विषयाला अनुमोदन देताना काँग्रेसच्या नगरसेविका शर्मिला पंडित यांनी सांगितले, की सफाई कामगार हजेरी शेडवर कधी येतात जातात या माहितीसाठी पंचिंग यंत्र (बायोमेट्रिक) बसवण्यात आले होते. ती यंत्रं कामगारांनी वेळेचे बंधन नको म्हणून तोडून टाकली.

कचऱ्यावरचे ‘लक्ष्मीपूजन’
पालिकेच्या ह आणि ड प्रभागातील कचरा उचलण्यासाठी पुरेसे कामगार नसल्याने पालिकेने गेल्या ऑक्टोबरमध्ये ४ जेसीबी आणि २० डंपर्स तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. एवढे करूनही या प्रभागातील १०० टक्क्यांपैकी फक्त ३० ते ४० टक्के कचरा उचलण्यात येत असल्याचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी तयार केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या तीन महिन्यांसाठी जेसीबी ठेकेदाराच्या देयकासाठी महापालिकेने २५ लाख २० हजार रुपये मोजले आहेत. आता येत्या दोन महिन्यांसाठी या ठेकेदारीला मुदतवाढ देऊन स्थायी समितीने १६ लाख ८० हजारांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. म्हणजे प्रभागातील कचरा उचलणाऱ्या जेसीबीसाठी पालिकेने पाच महिन्याच्या काळात ४२ लाखाची उधळपट्टी केली असल्याचे दिसून येत आहे.  
कचरा वाहतुकीसाठी पालिकेकडे १०० हून अधिक प्रकारची वाहने आहेत. तरीही २० डंपर भाडय़ाने घेऊन पालिकेने ठेकेदारांची दिवाळी सुरू ठेवली आहे. अधिक माहितीसाठी पालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला. ते व्यस्त असल्याने त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.