प्रभाग अधिकारी सकाळ, संध्याकाळ परिसरात ठाण मांडून
फेरीवाल्यांमुळे आपली वर्षभराची वेतनश्रेणी रोखल्यामुळे अस्वस्थ झालेले कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाचे नियंत्रक रवींद्र गायकवाड यांनी पूर्व भागातील उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथ, रॉथ रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम तीव्र केली आहे. उर्सेकरवाडी म्हणजे जणू आपली जहागिरी आहे असे समजून भायखळा, मस्जीद बंदर, मुंब्रा, अंधेरी परिसरातील परप्रांतीय फेरीवाले या भागात पदपथ, रस्ते अडवून बसत आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने येथील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे.
‘ग’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचे उर्सेकरवाडी येथील फेरीवाल्यांसोबत साटेलोटे आहेत, फेरीवाल्यांना हटविण्यात कर्मचारी बोटचेपी भूमिका घेतात, असा आरोप येथे रहिवाशांकडून नेहमी केला जातो. आयुक्त ई. रवींद्रन चार ते पाच दिवस रजेवर असल्यामुळे ते डोंबिवलीत फेरी मारण्यास येणार नाहीत याची जाणीव असल्याने ‘ग’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी संथ पद्धतीने काम करत आहेत अशा तक्रारीही होत्या. कारवाईत उर्सेकरवाडी, रॉथ रस्ता, रामनगर वाहतूक विभाग कार्यालयासमोरील फेरीवाल्यांचे साहित्य कर्मचाऱ्यांनी जप्त केले की ते पुन्हा मिळवून हे फेरीवाले पुन्हा येथे बस्तान बसवतात, अशा तक्रारीही रहिवाशांच्या होत्या. अखेर या तक्रारींची दखल घेऊन कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ‘फ’ प्रभागाचे अधिकारी भरत जाधव, संजय कुमावत व त्यांचे पथक नेहरू रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली भागात सकाळी, संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत तैनात असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून हा परिसर मोकळा झाला आहे, त्यामुळे रहिवाशी याबाबत समाधान व्यक्त करीत आहेत. उर्सेकरवाडीतील फेरीवाल्यांना कायमचे हटवितो असा चंग बांधून रवींद्र गायकवाड यांनी कारवाईची मोहीम तीव्र केल्याने ‘ग’ प्रभागातील काही कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे.

कारवाईसाठी अन्य प्रभागातील पथकही मदतीला
डोंबिवलीत फेरीवाल्यांना हटविले की नाही याची पाहणी करण्यासाठी आयुक्त आले की ते वाहनातून खाली उतरत नाही आणि रस्त्याने चालत नाहीत, याची जाणीव उर्सेकरवाडीतील फेरीवाल्यांना असल्याने आयुक्त येऊनही गल्लीबोळात असलेल्या उर्सेकरवाडीतील फेरीवाले जागेवर ठाण मांडून बसत होते. ‘लोकसत्ता ठाणे’ने हा प्रकार उघडकीला आणल्यानंतर पुन्हा आपल्याला नव्या कारवाईला सामोरे जायाला नको म्हणून फेरीवाल्यांचे नियंत्रक रवींद्र गायकवाड यांनी अन्य प्रभागातील फेरीवाला हटाव पथक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उर्सेकरवाडीतील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम सुरु केली आहे.