टीडीआरच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचा रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव
विकास हस्तांतरण हक्काच्या (टीडीआर) माध्यमातून शहरातील रस्त्यांचा विकास करण्याचे ठाणे महापालिकेचे धोरण कल्याण-डोंबिवलीतही अवलंबिले जाणार असून झपाटय़ाने विकसित होणाऱ्या शीळ मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण अशाच पद्धतीने केले जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने आखलेल्या पंचवार्षिक विकास आराखडय़ात यासंबंधीचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. शिळफाटा मार्गावर नियमित होणारी कोंडी सोडविण्यासाठी तसेच या भागात रोजगाराची साधने तयार करण्यासाठी हा विकास केला जाणार आहे. राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याच भागात कल्याण विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याने शीळ-कल्याण महामार्गाच्या रुंदीकरणाची आणखी निकड भासू लागली असून त्यामुळे विकसकांची मात्र चंगळ होणार आहे.
राज्याच्या विविध भागातील मुख्य रस्ते रुंदीकरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारने कल्याण-शीळ रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने कल्याण-डोंबिवली शहरांमधून गेलेल्या रस्तेरुंदीकरण कामाचा लाभ उठविण्याचे नियोजन केले आहे. येणाऱ्या काळातील कल्याण शहर परिसरातील वाहतूक कोंडी विचारात घेऊन कोन (भिवंडी) ते कल्याण शिळफाटा रस्त्यावर उन्नत मार्ग बनविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व सुधारणांचा कल्याण-डोंबिवली शहराला अधिकाधिक लाभ कसा मिळेल या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
दुर्गाडी पूल ते शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावाजवळील लोढा हेवन चौकापर्यंतची भौगोलिक हद्द कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत येते. या सात ते आठ किलोमीटर लांबीच्या दुतर्फा चाळीस ते साठ फुटांची जागा पालिकेच्या मालकीची आहे. शिळफाटा रस्त्यावरील सात ते आठ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फाची जागा ‘हस्तांतरणीय विकास हक्क’च्या (टीडीआर) माध्यमातून रस्ते विकास करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’, ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण’ सारख्या संस्थांना विकली तर कोटय़वधी रुपयांचा महसूल महापालिकेला ‘टीडीआर’च्या माध्यमातून मिळू शकणार आहे. रस्ते विकास करणाऱ्या संस्था रस्त्याच्या दुतर्फा वाणिज्यविषयक बांधकामे करून, महसुलाचा स्रोत निर्माण करतील. हा पैसा त्यांना अन्य रस्ते विकासकामांसाठी वापरता येईल. शीळफाटा रस्त्याच्या दुतर्फा काही भागांत वाणिज्य, व्यापारी गाळे, काही भागांत दुचाकी, चारचाकी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी तयार होतील. शीळफाटा रुंदीकरण झाल्याने या रस्त्याला जो नेहमी वाहतूक कोंडीचा विळखा पडतो. तो कायमचा संपुष्टात येईल. रस्तारुंदीकरण करतानाच बस मार्ग, सायकलीसाठी वेगळा मार्ग, पादचाऱ्यांसाठी पदपथ ठेवले तर कोंडीतील मोठा अडथळा दूर होणार आहे, असे पालिकेतील सूत्राने सांगितले.
दुर्गाडी ते पत्रीपूल असा उन्नत मार्ग पालिका स्वप्रयत्नांतून करणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तीनशे कोटी खर्च अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात महापे-शीळफाटा ते भोपर-भिवंडी असा रस्ता प्रस्तावीत आहे. या रस्त्यामुळे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचा ओघ वाढणार आहे.

आठवडाभर रस्ता बंद..
ठाणे स्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून त्यानंतर आता या रस्त्यांची डागडुजी आणि रॅबिट उचलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून हा रस्ता आठवडाभर वाहतूक तसेच नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार सुभाष पथ ते जुनी महापालिका इमारत आणि जनता फॅशन हाऊस ते अशोक टॉकीज हा रस्ता एक आठवडा बंद राहणार आहे. असे असले तरी, जिल्हा परिषद कार्यालयाकडून दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहांकडे जाणारा रस्ता मात्र वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. परंतु आतील दोन्ही रस्त्यांवर केवळ महापालिकेचे कामगार आणि दुकानदार यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. स्थानक परिसर रस्ता रुंदीकरण मोहीम आणि त्या कामासंबंधीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी घेतलेल्या विशेष बैठकीत आयुक्त जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.