स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधानंतर पालिकेची नरमाईची भूमिका; मोहिमेला स्थगिती देण्याचा निर्णय
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी कल्याण पूर्व भागातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धडपड सुरू झाली असून ही बांधकामे ग्रामपंचायतकालीन असल्याने त्यावर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त ई.रिवद्रन यांची भेट घेऊन केली. यावेळी गावातील सर्वपक्षीय संघर्ष समितीचे नेतेही त्यांच्यासोबत होते.
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील बहुतांशी बांधकामे ही ग्रामपंचायतींनी दिलेल्या परवानग्यांमधून उभारण्यात आली आहेत. या बांधकामांना महापालिकेची परवानगी नाही. अनेक वर्षांपासूनची २७ गावांमधील बांधकामे असल्याने ती तोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली. गायकवाड यांच्या मध्यस्तीमुळे २७ गावांमधील बेकायदा बांधकामे तोडकामाच्या मोहिमेला अडथळा निर्माण झाला आहे. मंगळवारी २७ गावांमधील आशेळे गावापासून बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली होती. पाडकामासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याच वेळी आमदार गणपत गायकवाड, संघर्ष समितीचे पदाधिकारी आयुक्तांच्या भेटीसाठी आले.
यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी शहरी भागातील बेकायदा बांधकामे आधी तोडा अशी मागणी करत होते. ज्या बांधकामांना कोणत्याही प्रकारच्या परवानग्या नाहीत. ती सगळी बांधकामे पाडकामासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन संघर्ष समितीने आयुक्तांना दिले. परंतु, २७ गावांमधील बांधकामे तोडण्यात आली तर राजकीय वाद निर्माण होऊ शकतो आणि ते लोण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचू शकते, या भीतीने प्रशासनाने २७ गावांमधील बेकायदा बांधकाम तोडण्याची मोहीम थांबवली असल्याचे आयुक्तांबरोबरच्या बैठकीला उपस्थित असलेल्या समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

२७ गावांमध्ये एमएमआरडीए व ग्रामपंचायतीची परवानगी नसलेली जी नव्याने बांधकामे उभी राहत आहेत. ती बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे .जुन्या परवानगी असलेल्या एकाही बांधकामाला हात लावला जाणार नाही, नवीन परवानग्या नसलेली सर्व बांधकामे तोडण्यात येतील.
ई. रवींद्रन, आयुक्त, कल्याण डोंबिवली</strong>

२७ गावांमधील बहुतांशी बांधकामांना ग्रामपंचायतीने परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे तेथील बांधकामे तोडण्यात येऊ नयेत. तसेच यासंर्दभात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.
गणपत गायकवाड, आमदार, भाजप