संभाव्य वाहतुकीचा ओघ लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नियोजन

कल्याण बाह्य़वळण रस्ते कामामधील पहिल्या टप्प्याची कामे ही माणकोली, ठाकुर्ली आणि गंधारे या तीन उड्डाण पुलांच्या भागांत प्राधान्याने होणार आहेत. माणकोली व ठाकुर्ली उड्डाण पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतर या पुलांवरील वाहतुकीचा ओघ वाढणार आहे. या वाहतुकीचे पूर्वनियोजन म्हणून उड्डाण पुलांच्या भागात बाह्य़वळण रस्त्यामधील पहिल्या टप्प्याची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कल्याण शहर बाह्य़वळण रस्त्यासाठी (रिंगरूट) ९० कोटी ६४ लाखांची निविदा प्रसिद्ध केली आहे. बाह्य़वळण रस्त्याचा एकूण प्रकल्प सुमारे ३५० कोटींहून अधिक रकमेचा आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या बाह्य़वळण रस्त्याचे नियोजन दहा वर्षांपूर्वीच पालिकेकडून करण्यात आले होते. निधीअभावी हे काम रखडले होते.

बाह्य़वळण रस्त्यासाठी यापूर्वी कोपर ते पत्रीपूल, गंधारे ते टिटवाळा असा सुमारे २१ किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित होता. दीड वर्षांपूर्वी २७ गावे पालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे भोपर गावचा समावेश या रस्त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आता सुमारे ३० ते ३५ किलोमीटरचा होणार आहे. भोपर ते पत्रीपूल मार्गे, गंधारे उड्डाण पूल ते टिटवाळा या प्रस्तावित बाह्य़वळण रस्त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या काही जमिनींचे भूसंपादन पालिकेने पूर्ण केले आहे. काही ठिकाणच्या जमिनींचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. काही ठिकाणी जमीन मालकांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. तर काही ठिकाणी जमीन मोजणीचे माप बदलल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जेवढी जमीन पालिकेने संपादित केली आहे, तेवढय़ा टप्प्यात प्राधान्याने रस्ते कामे करण्यात येणार आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील माणकोली उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलाच्या आसपासच्या बाह्य़वळण रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच, ठाकुर्ली येथील स. वा. जोशी शाळेजवळील उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. कल्याणमधील गंधारे पुलावरून वाहनांची सतत ये-जा असते. हे उड्डाण पूल येणाऱ्या काळात वाहनांनी गजबजणार असल्याने या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी पोहोच रस्त्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बाह्य़वळण रस्त्याची पुलांजवळील कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

भूमी अभिलेख विभागाची आडकाठी

बाह्यवळण रस्त्यासाठी महापालिकेच्या सर्वेक्षण दाखवून दिलेल्या हद्दीत भूम अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केली. या मोजणीत तांत्रिक अडथळे उभे राहिल्याने रस्त्याची उभारणी करताना अडथळे येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने केलेल्या मोजणीचे नकाशे पालिकेच्या सर्वेक्षण विभागाला मिळाले तर मोजणी करताना झालेली तांत्रिक चूक सुधारून सुधारित बाह्य़वळण रस्त्याचा नकाशा करता येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. ही मागणी भूमी अभिलेख विभागाने मान्य केलेली नाही. त्यामुळे नव्याने मोजणीसाठी अर्ज करा, पैसे भरा मग बघू, अशी कारणे देण्यात येत असल्याने सर्वेक्षण विभागाची कामे अडकून पडली आहेत. भूमी अभिलेख विभाग नकाशे देत नाहीत तोपर्यंत नव्याने मोजणी, सुधारित नकाशे व भूसंपादन करणे शक्य होणार नाही, असे सर्वेक्षण विभागाचे मत आहे.